Five candidates withdraw from the election in Gangapur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत चालले आहे. जिल्हा परिषदेच्या एका उमेदवाराने व पंचायत समितीच्या चार गणांमध्ये चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एकूण उमेदवारांची संख्या घटली आहे.
गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ९ गटांतून एकूण ८१ उमेदवार रिंगणात होते तर आज एका उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आज रोजी ८० उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये सुरुवातीला १४४ उमेदवार रिंगणात होते. मात्र आज चार उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता १४० उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
आज झालेल्या अर्ज माघारी प्रक्रियेत दि. २३ रोजी लिंबे-जळगाव गणातून ज्योती तुकाराम मिठे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच घोडेगाव गणातून उषा अर्जुन पवार (अपक्ष) यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.
दिनांक २४ रोजी जिल्हा परिषद जोगेश्वरी गटातून सोनु अमोल लोहकरे तर शिल्लेगाव गणातून भाऊसाहेब आसाराम चिंधे व सावंगी गणातून सुरेश अंबादास जाधव यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले असून २७ जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असल्याने आणखण उमेदवारअर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.
प्रचाराला येणार वेग
अर्ज माघारीनंतर आता तालुक्यातील अनेक गणांमध्ये थेट लढतींचे चित्र स्पष्ट होत असून प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिकच गती येणार आहे.