Fires at 30 places due to sparks from firecrackers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला फटाक्यांच्या आतषबाजीने शहराचा आसमंत उजळून निघाला असला तरी, याच आतषबाजीतील ठिणग्यांनी शहरातील विविध भागांत आगीच्या तब्बल ३० घटना घडल्या.
रविवारी (दि. ८) शहर आणि परिसरामध्ये मोकळ्या मैदानातील गवत, कचरा, झाडे, बंद घरे आणि दुकानांनी पेट घेतला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, बीड बायपासवरील एका गॅरेजला लागलेल्या आगीत चार वाहनांचे नुकसान झाले आहे. यंदा दिवाळीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली. रॉकेट, अॅटमबॉम्ब, सेव्हन शॉट, आणि आकाशात उंच उडणाऱ्या फटाक्यांमुळे शहरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळाले. या उडणाऱ्या फटाक्यांच्या ठिणग्या खाली पडून अनेक ठिकाणी गवत, कचरा आणि इतर वस्तूंनी पेट घेतला.
दिवाळीत आगीच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा अग्रिशमन विभागप्रमुख अंकुश पांढरे यांनी दलाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. अग्निशमन विभागप्रमुख अशोक खांडेकर यांनी पदमपुरा, सिडको आणि चिकलठाणा येथील केंद्रांच्या पथकांना घटनास्थळी रवाना करून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले.
शहरात येथे घडल्या आगीच्या घटना
गॅरेज व व्यावसायिक ठिकाणे : बीड बायपासवरील आयप्पा मंदिराजवळील गॅरेज (४ वाहनांचे नुकसान), सिडको एन-१ सर्व्हिस इंडस्ट्रियल परिसरातील संकेत मोटार गॅरेज, नारेगाव चौफुलीवरील कुलर कंपनी, चिस्तीया चौकातील पत्र्याचे दुकान आणि फुलंब्री येथील समृद्धी कृषी उद्योगाची दोन दुकाने.
2 गवत व कचरा : हर्सल टी पॉईंट येथील पेट्रोलपंपामागील मैदान, नागसेननगर (गाडे चौक) कचरा कुंडी, सिडको एन-६ (प्रेरणा व एसबीओ शाळेजवळील गवत), प्रोझोन मॉलजवळील गवत, मुकुंदवाडीतील कोरड्या विहिरीतील कचरा, आरटीओ कार्यालयाजवळील मोकळे मैदान, आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहाजवळील मैदान.
3 घरे व झाडे : हडको सर्व्हिस रोडवरील बंद घर, गजानन महाराज मंदिरामागील घराची टेरेस, मोदक हॉटेलजवळील बंद घर, श्रेयानगरमधील घराची गॅलरी, नागेश्वरवाडी (पोलिस उपआयुक्त कार्यालयाजवळील झाड), आणि ज्योतीनगर परिसरातील झाड.
4 इतर परिसर : शहागंज जुने बसस्थानक, मुसा चौक (जिन्सी), पिसादेवी रोडवरील गुरांचा वाडा, छावणी लष्कर परिसर, बिबी का मकबरा (टी पॉईंटजवळ), भाग्यनगर (धूत मोटारजवळ), राजाबाजार (बाबू मार्केट परिसर), वाळूजपुढील जुने मकान आणि पहाडसिंगपुरा (भंगाराचे दुकान).