छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील २४ तासांत आगीच्या दोन घटना घडल्या असून, यामध्ये हेडगेवार हॉस्पिटल परिसरात लेबर कॅम्पला आणि न्यू नंदनवन कॉलनीतील घराला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने, अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्-परतेमुळे दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहिल्या घटनेत दुपारी १२:१० वाजेच्या सुमारास हेडगेवार हॉस्पिटल जवळील सार्थी इन्स्टिट्यूट परिसरात असलेल्या एका लेबर कॅम्पला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राचे पथक बंबासह ड्युटी अधिकारी मुस्ताक तडवी, राजू ताटे, योगेश दुधे आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत लेबर कॅम्पमधील साहित्याचे नुकसान झाले असले तरी सर्व कामगार सुरक्षित आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरी घटना रविवारी रात्री ८:२३ वाजेच्या सुमारास न्यू नंदनवन कॉलनीतील चंदमिरी मशिदीजवळ घडली. घटनेची माहिती शेख नवीद यांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने रवाना झाले आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.