

परभणी ः शहर मनपाच्या निवडणुकीमध्ये काही निवडक भागांकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले असून या प्रभागामधून दिग्गज मंडळी आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोर पकडला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिल्याचे शेवटच्या टप्प्यात दिसून येत आहे. एहरातील 1, 4, 5, 15 या प्रभागांकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 1 ड मधून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.तुकाराम रेंगे पाटील यांचे चिरंजीव दत्तराव रेंगे पाटील हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी आ. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख यांच्यासोबत दतराव रेंगे यांची लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अंकुश हावळे हे निवडणूक रिंगणात आहेत.
शहरातील प्रभाग क्रमांक 4 च्या लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 4 ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राहुल खटिंग तर शिवसेना शिंंदे गटाकडून सचिन पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या प्रभागामध्ये काही विशिष्ट उमेदवारांकडून लक्ष्मी अस्त्राचा मुबलकपणे मारा होताना दिसून येत आहे. काही उमेदवारांनी प्रभागातील महिलांना देवदर्शनही घडवून आणले. याच प्रभागात काही दिवसांपूर्वी अक्षय देशमुख व विशाल बुधवंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती.
प्रभाग क्रमांक 5 कडेही संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 5 क मधून माजी महापौर तथा भाजपाचे निवडणूक प्रमुख सुरेश वरपूडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपूडकर निवडणूक रिंगणात आहेत. वरपूडकर यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. मीनाताई वरपूडकर यांच्या विरोधात यशवंत सेनेच्या देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुसुम जोगदंड या रिंगणात आहेत.
प्रभाग 5 ङ मध्येही तुल्यबळ लढती होत आहेत. येथे भाजपाचे रितेश झांबड, यशवंत सेनेचे सचिन देशमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवींद्र पतंगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते विजय वरपूडकर यांचे चिरंजीव ऐश्वर्य वरपूडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक विजय जामकर निवडणूक रिंगणात आहेत. येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अहजम अफनान खान निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाने या वार्डातून डॉ.राजू सुरवसे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश भिसे हा कडवट शिवसैनिक निवडणूक रिंगणात आहे.
प्रभाग क्रमांक 15 येथील लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. विसर्जित मनपामध्ये या प्रभागात सर्वच नगरसेवक भाजपाचे विजयी झाले होते. या प्रभागातून भाजपाकडून मंगल मुदगलकर, अश्विनी वाकोडकर, सुशीला थोरात, डॉ.केदार खटिंग हे निवडणूक रिंगणात आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपाली कटारे, शकुंतला रोडगे, अस्मिता वाकळे, सिध्दांत हाके, वैभव शिंदे निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग 16 ड मधून माजी नगराध्यक्ष जयश्री खोबे यशवंत सेनेकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपाने जयश्री धबाले यांना निवडणूक रिंगणात उतरवले. शिवसेना शिंदे गटाकडून निर्मला गव्हाणे तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शेख रईस तर एमआयएमकडून सय्यद इरफान हे निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग 16 पैकी दिग्गज मंडळी लढत असलेल्या अनेक प्रभागांकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मतदार अनेक दिग्गजांपैकी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सोळाही प्रभागांत चुरशीच्या लढती होण्याचे संकेत मिळत आहेत.