Fire at a company in the Ranjangaon area; losses worth lakhs
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : कोरियेगेटेड तसेच पी.पी. बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीला शनिवारी (दि. २४) पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पी. पी. बॉक्स, कोरियेगेटेड बॉक्स, प्लास्टिक रॉ मटेरियल तसेच मशीनरी जळून खाक झाले. या आगीची झळ लगतच्या कंपनीलाही बसल्याने मोठे नुकसान झाले.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार अजय बोरुडे यांची रांजणगाव शिवारातील गट नंबर ११८ मध्ये गुरुकृपा इंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत प्लास्टिक पार्टीशियन तसेच पी. पी. बॉक्स व कोरियेगेटेड बॉक्स तयार केले जातात. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास या कंपनीतून धुराचे लोळ बाहेर निघत असल्याचे लगतच्या रुद्रा इंटरप्रायजेस कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना दिसून आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने तीन ते साडे तीन तासांच्या परिश्रमानतंर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत कंपनीतील तयार बॉक्स, प्लास्टिक रॉ मटेरियल, मशीनरी तसेच कंपनीचे संपूर्ण शेड जळून खाक झाले. या आगीची झळ लगतच्या रुद्रा पॉली इंटरप्राइजेस कंपनीला देखील बसली.