Baba Farjan cash seizure pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : बाबा फर्जनच्या संपत्तीवर मुलाचा दावा

२० वर्षांपूर्वीच सोडले होते घर; शस्त्रास्त्रे आणि पैशाबाबत नव्हती कल्पना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात २० च्या दशकात कामगार संघटनांच्या माध्यमातून दरारा निर्माण करणारा आणि महिन्याभरापूर्वी निधन झालेल्या बाबा फर्जन याच्या आलीशान बंगल्यावर पोलिस छाप्यात तब्बल साडेपाच कोटी रुपयांची रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, बाबा फर्जनचा मुलगा फिरदोस फर्जन यांनी माध्यमांसमोर येत या संपूर्ण संपत्तीवर आपला कायदेशीर दावा ठोकला आहे.

फिरदोस म्हणाले की, माझ्या वडिलांची शेती, घर आणि घरातून पोलिसांनी जप्त केलेले साडेपाच कोटी रुपये यावर आम्हा दोन्ही भावांचा हक्क आहे. तो माझ्या वडिलांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा पैसा आहे. पोलिस छाप्यात सापडलेले घबाड आणि शस्त्रास्त्रांबाबत विचारले असता फिरदोस म्हणाले, मी जेव्हा २० वर्षांचा होतो तेव्हाच काही कारणांमुळे बाबांना सोडून आम्ही स्वतंत्र राहायला गेलो होतो. आमच्यात कोणताही वाद नव्हता, मात्र तेव्हापासून आम्ही वेगळे आहोत. त्यामुळे त्यांच्या घरात असलेल्या बंदुका, शस्त्रसाठा आणि एवढ्या मोठ्या रकमेबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. हे सर्व घबाड सापडल्याचे आम्हाला मीडियाच्या माध्यमातूनच समजले.

सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा फर्जन यांच्या बंगल्यात सापडलेली रायफल, पिस्टल, एअरगनसाठीची तब्बल ६, ३५० जप्त केलेली काडतुसे मुंबई, पुणे, बंगलोर व मध्यप्रदेश येथून खरेदी केल्याचे समोर आले आहे. काडतुसे अधिकृत कंपनीकडून खरेदी केली होती का ? याबाबत तपास केला जात आहे.

बाबा फर्जनच्या नावे मिटमिटा परिसरातील बंगल्याच्या आजूबाजूला सुमारे ६ एकर जमीन आहे तर, अन्य काही ठिकाणीही जमीन आहे. तसेच रोहिला गल्लीतील त्याचा बंगला आणि जुना बर्फाचा कारखाना तब्बल दीड एकर परिसरात पसरलेला आहे. मिटमिटा येथील जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे २२ कोटीच्या घरात आहे, तर रोहिला गल्लीतील मालमत्तेची किंमत तब्बल ४० कोटींच्या आसपास असू शकते. या स्थावर मालमत्तेसोबतच बंगल्यातून ५ कोटी २७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावरून सद्यस्थितीत बाबा फर्जनची मालमत्ता ६५ कोटीहुन अधिक असल्याचे बोलले जात आहे.

'ती' पत्नी नसून केअरटेकर

सध्या बाबा फर्जनच्या घरात राहणारी व अटकेतील शीलाबाई साळवे ही त्यांची पत्नी नसून, केवळ एक 'केअरटेकर' म्हणून तिथे राहत असल्याचा दावा फिरदोस यांनी केला आहे.

घबाड हडपण्याचा डाव फसला ?

बाबा फर्जन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे मोठा ऐवज असल्याची कुणकुण एका टोळीला लागली होती. त्या टोळीने ऐवज लंपास करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती, मात्र त्या टोळीमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांना टीप मिळाली. त्यानंतर छापेमारीत सर्व घबाड पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

शीलाबाईला न्यायालयीन कोठडी

आरोपी शीलाबाई साळवे हिची चार दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी (दि.१४) पुन्हा न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिची हर्सल कारागृहात रवानगी केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. दरम्यान, शीलाबाईच्या बहिणीचीही पोलिसांनी चौकशी केली. तर बाबा फर्जन यांचे बंधू चौकशीसाठी आले नव्हते.

मृत्यूबाबतही ठेवले अंधारात

आपल्या वडिलांच्या मृत्यूबाबतही आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप फिरदोस यांनी केला आहे. बाबांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. मी त्यांना शेवटचे २७ मार्च रोजी भेटलो होतो, तेव्हा ते व्यवस्थित होते. मात्र त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आम्हाला घरातून दिली गेली नाही, तर इतर बाहेरच्या लोकांकडून आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली, असेही फिरदोस यांनी स्पष्ट केले. या पैशावर आणि संपत्तीवर आता वारसदार म्हणून कायदेशीर मार्गाने दावा करणार असल्याचे फिरदोस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या 'डॉन'च्या संपत्तीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकांसाठी डॉन असतील..

लोकांसाठी माझे वडील डॉन असतील, पण आमच्यासाठी ते चांगले वडील होते. त्यांच्या कष्टाचा पैसा वारसदार म्हणून मलाच मिळाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी फिरदोस यांनी केली आहे. बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर आणि पोलिसांच्या कारवाईनंतर प्रथमच त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना आपली बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT