Dombivali Crime| तोतया पोलिसांनी कल्याणकर आजोबांचे जोडले दहशतवाद्यांशी संबंध, डिजिटल ॲरेस्टची भिती दाखवून  २७.९० लाखांचा गंडा

संबधित सेवानिवृत्त अधिकारी, खडकपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
Online Share Trading Fraud
Dombivli Crime| तोतया पोलिसांनी कल्याणकर आजोबांचे जोडले दहशतवाद्यांशी संबंध, डिजिटल ॲरेस्टची भिती दाखवून  २७.९० लाखांचा गंडा(File Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या वाडेघर परिसरातील एका उच्चभ्रू वस्तींच्या गृहसंकुलात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय आजोबांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या थापा तर मारल्याच, शिवाय तुम्ही बँक खात्यामधून काही संशयास्पद गैरव्यवहार केले आहेत असे सांगून डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन आजोबांना घाबरवून सोडणाऱ्या दोघा तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी या आजोबांकडून २७ लाख ९० हजार रूपये उकळले आहेत. 

गेल्या सात दिवसांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या आजोबांनी या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे.

ईस्माईल अब्बास सुरका (६३) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून ते आपल्या कुटुंबीयांसह कल्याण पश्चिमेकडे वाडेघर रोडला असलेल्या रौनक सिटी गृहसंकुलात राहतात. ईस्माईल सुरका यांच्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलिसांनी तोतया वरिष्ठ पोलिस निरीक्षक आकाश शर्मा आणि त्याचा साथीदार प्रेमा कुमार या दोघा बदमाशांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आकाश शर्मा या बदमाशाने आपण मुंबई पोलिस दलात नोकरीला असल्याची थापेबाजी केली आहे.

दहशतवादी डाॅ. शाईन फाईलशी संबंध ?

या संदर्भात तक्रारदार ईस्माईल सुरका यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सात दिवसांपूर्वी आपणास व्हॉट्स ॲप आणि नियमित फोनवर दोघा अनोळखी इसमांनी संपर्क साधला. आपण मुंबई दलात नोकरीला आहोत. तुमचे डाॅ. शाईन फाईल या दहशतवाद्याशी संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तुमच्या बँक खात्यामधून काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत. या सर्व प्रकरणांची आम्ही चौकशी करत आहोत. मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून आकाश शर्मा आणि प्रेम कुमार या दोघांनी ईस्माईल सुरका यांना वेगवेगळ्या प्रकारची खोटी माहिती देऊन घाबरून सोडले. तब्बल आठवडाभर चौकशीच्या नावाखाली दोघा बदमाशांनी इस्माईल सुरका यांना भंडावून सोडले होते.

...अन् आजोबा फसले बदमाशांच्या जाळ्यात

आपण कोठेही काही केले नाही. आपला कशाशी संबंध नाही, असे सांगूनही दोघे तोतया पोलिस अधिकारी इस्माईल सुरका यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. तुमच्या सर्व प्रकरणांची चौकशी आमच्याकडे आहे. यातून सहीसलामत बाहेर पडायेच असेल तर आपण आम्ही तुमची सुटका करू शकतो, असेही त्या बदमाशांनी इस्माईल सुरका यांना सांगितले. पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केलेले दोघे बदमाश व्हॉट्स ॲपच्या व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून इस्माईल सुरका यांच्याशी संभाषण करत होते. त्यामुळे ते दोघेही खरे पोलिस अधिकारी असावेत असे सुरका यांना वाटत होते. जाळ्यात फसल्यानंतर दोघा बदमाशांनी वेगवेगळी कारणे सांगून इस्माईल यांच्याकडून ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल २७ लाख ९० हजार रूपये उकळले. मात्र कालांतराने हा सारा प्रकार बनावट असल्याची खात्री पटल्यानंतर इस्माईल सुरका यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील अधिक तपास करत आहेत.

ज्येष्ठांसह महिलांनाही डिजिटल ॲरेस्टच्या धमक्या

गेल्या वर्षभरापासून कल्याण-डोंबिवलीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना डिजिटल ॲरेस्टच्या धमक्या देऊन बदमाशांनी लाखो रूपये उकळले आहेत. भामट्यांच्या धमक्यांना घाबरून फसगत झालेल्यांमध्ये काही उच्चशिक्षित नागरिकांचाही सहभाग आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सायबर सेल देखिल प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कल्याण पश्चिमेकडील पारनाका परिसरात कुटुंबियांसह राहणाऱ्या गौरी उपेंद्र घारपुरे (६७) असे वृध्द महिलेकडून बदमाशांनी ऑनलाईनद्वारे तब्बल ६३ लाख ५० हजार रूपये उकळल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण आणि उत्तरप्रदेशात वास्तव्यास असलेल्या अब्दुस सबूर सरदारअली (६८) या सेवानिवृत्ताला दोघा भामट्यांनी डिजिटल ॲरेस्टची भिती दाखवून २३ लाख ५० हजार रूपयांचा गंडा घातला आहे. या गुन्ह्याचा महात्मा फुले चौक पोलिसांकडून तपास सुरू आहे. तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी मनोहर आगरकर या नोकरदार डोंबिवलीकराला तब्बल ७१ लाख १० हजार रूपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news