Finally, the road construction work in Shendra MIDC will begin.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील दयनीय दुरवस्था झालेल्या सर्वच रस्त्यांचे नशीब उजळणार आहे. यासंदर्भात दैनिक पुढारीच्या वृत्त मालिकेची दखल घेत प्रशासनाने खराब रस्त्यांची पाहणी करुन त्याच्या दुरुस्तीसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याची हालचाल सुरू केली आहे. तसे आदेशच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी दिले आहेत. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.
औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीमधील कोट्यवधींच्या निधीतील रस्ते निकृष्ट कामांमुळे काही महिन्यांतच उखडले आहेत. अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने फाईव्ह स्टार इंडस्ट्री नव्हे तर स्लम औद्योगिक वसाहत असे चित्र आहे. याचा उद्योजक कामगारांना नाहक त्रास होत असल्याने हे चित्र सुधारण्यासाठी दै. पुढारीने वृत्त मालिकेव्दारे वाचा फोडली. याची गंभीर दखल घेत काही महिन्यात खराब झालेल्या एओपीक्यूआर.. आणि डी ब्लॉक या दोन नवीन रस्त्यांची कामे पुन्हा सुरु झाली.
यापैकी एअ-ोपीक्यूआर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तर डी ब्लॉकमधील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. एमआयडीसीमधील इतरही दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. या औद्योगिक क्षेत्रातील खड्डेमय आणि चाळणी झालेल्या रस्त्यांच्या पाहणी करुन त्याची यादी तयार करावी, त्यानूसार काही रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार शेंद्रा एमआयडीसीतील ज्या-ज्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्या रस्त्यांची पाहणी करावी, त्यानूसार प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना उपअभियंताना केल्या आहेत. हा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.रामचंद्र गिरी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.
खराब रस्त्यांची पाहणी या औद्योगिक क्षेत्रातील दोन रस्त्यांची दुरुस्ती सुरु केली आहे. एका रस्ता पूर्ण झाला तर दुसऱ्याचे काम सुरू आहे. इतरही सर्व खराब आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांची पाहणी करुन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.- राजेश चव्हाण, उपअभियंता, एमआयडीसी