Female police officer of Daulatabad police station caught taking bribe of Rs 20,000
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तक्रारदार महिला व तिच्या मित्राविरुद्ध तिच्या पतीने दौलताबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही न करण्याच्या बदल्यात २० हजारांच्या लाचेची मागणी करून थेट घरी बोलावून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. २७) गारखेडा परिसरात एमरॉड सिटी येथे करण्यात आली. लता बाळासाहेब दराडे (३७, रा. एमरॉड सिटी, गारखेडा परिसर) असे अटक आरोपी महिला जमादाराचे नाव असून, तिच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीसह ती व तिचा मित्र राहुल विरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जावर कार्यवाही न करण्यासाठी व त्यात मदत करण्यासाठी प्रत्येकी दहा असे एकूण २० हजारांच्या लाचेची मागणी जमादार लता दराडे हिने तक्रारदार महिलेकडे केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने २६ नोव्हेंबर रोजी एसीबीकडे प्रत्यक्ष हजर राहून लेखी तक्रार नोंदवली.
एसबीच्या पथकाने पडताळणी करण्यासाठी तक्रारदार महिला व तिचा मित्र राहुलला लता दराडेकडे पाठवले. पडताळणीत दराडे यांनी २० हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, जमादार दीपक इंगळे, सचिन बारसे, रामेश्वर गोरे, सी एन बागुल यांच्या पथकाने केली. अधिक तपास उपअधीक्षक संगीता पाटील करत आहेत.
थेट घरीच बोलावून घेतली लाच
लता दराडे हिने महिलेला आणि तिच्या मित्राला सकाळी ११ वाजता बोलावले होते. त्यामुळे एसीबीच्या पथकाने दौलताबाद ठाण्यात सापळा लावला. मात्र, दराडे ठाण्यात हजर नसल्याने तक्रारद-ारांनी त्यांना कॉल केला. मी पैसे घेवून आलोय कुठे आहात ? त्यावर दराडे यांनी अगोदर बाबा चौकात येण्यास सांगितले. चौकात येऊन कॉल केल्यानंतर तुम्ही शिवाजीनगरला या असे सांगितले. तिथेही गेल्यावर एमरॉड सिटी कॉलनीतील घरीच बोलवुन घेत २० हजार स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पकडले