World Blood Donor Day : अंधश्रद्धा, गैरसमजामुळे रक्तदानाची भीती File Photo
छत्रपती संभाजीनगर

World Blood Donor Day : अंधश्रद्धा, गैरसमजामुळे रक्तदानाची भीती

जागतिक रक्तदाता दिन : जिल्ह्यात वारंवार होतो तुटवडा, भटकंतीची वेळ

पुढारी वृत्तसेवा

Fear of blood donation due to superstition and misunderstanding

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक सदृढ व निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन वारंवार केले जाते. यासाठी शासन, प्रशासनस्तरावर जनजागृतीही सुरू असते. मात्र, अद्यापही रक्तदानासंबधी काही गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती असल्यामुळे रक्तदानाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वारंवार रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन अनेकांना रक्ताची शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर हे मागील काही वर्षांत मेडिकल हब म्हणून नावारूपास येत आहे. शहरात घाटी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या शासकीय रुग्णालयासोबत अनेक खासगी मोठी हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी रुग्णालये आहेत. त्यामुळे शहरातील नव्हे तर मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश, नाशिक आणि इतर अनेक जिल्ह्यातून उपचारासाठी येथे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात.

या रुग्णांना महिन्याला हजारो रक्त पिशव्यांची गरज पडते. त्या तुलनेत रक्त संकलन कमी होत असल्याने याचा आर्थिक फटका रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र तुलनेत रक्तदात्याचे प्रमाण कमीच आहे. सुमारे ३५ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात रक्तदात्यांचे संख्या एक लाखावर नसल्याची खंत रक्तपेढ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रक्तदान पुण्यकर्म, प्रत्येकाने करावे

रक्तदानासंबंधी अज्ञान, गैरसमज, भीती दूर करण्यासाठी व्याख्याने, प्रशिक्षण सातत्याने सुरूच आहे. रक्तदान शिबिरापूर्वीही प्रबोधन केले जाते. रक्तदान केल्याने काही धोका होईल. काहींना सूईची भीती वाटते. परंतु रक्तदान हे पुण्यकर्म आहे. ते प्रत्येकाने केले पाहिजे.
- पुरुषोत्तम पुरी, सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद.

घाबरू नका, रक्तदानासाठी पुढे या

१८ ते ६० वर्ष वयोगटातील कोणताही सदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. मात्र, रक्तदानाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो. दात्यांनी न घाबरता उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन घाटी उपाधिष्ठाता तथा रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे यांनी केले.

रक्त संकलनात अनेक अडचणी

जनजागृतीमुळे रक्तदानाचे प्रमाण वाढत असले तरी अद्यापही रक्तदान केल्याने त्रास होईल, अशक्तपणा येईल. शरीरातील रक्त संपून जाईल. असे अनेक गैरसमज कायम आहेत. अंधश्रद्धा आणि भीती यामुळेही रक्त संकलनात अडचणी येतात. उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारेही हजारो आहेत.
- शामराव सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, लायन्स रक्तपेढी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT