Farewell to Ganpati Bappa, at city of Waluj
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगर परिसरात शनिवारी (दि.६) रिमझिम पावसात झांज व लेझीम पथकातील मुला-मुलींनी चित्तथरारक सादर केलेल्या कवायती तसेच पारंपरिक टाळ-मृदंग, ढोल, ताशांच्या निनादात मंडळाच्या वतीने लाडक्या गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील हायटेक महाविद्यालयापासून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
सर्वात पुढे सिध्दिविनायक गणपती मंदिराचा मानाचा गणपती त्यापाठोपाठ लोकमान्य गणेश मंडळ, रणरागिणी, पंचमुखीचा राजा, पावन हनुमान, रणसंग्राम क्रीडा मंडळ, शिवपुत्र प्रतिष्ठान, सिंह गर्जना क्रीडा मंडळ, संभाजी क्रीडा मंडळ, महारुद्र गणेश मंडळ, श्री जागृत गणेश मंडळ, अंजनी पुत्र युवा प्रतिष्ठान, दिशा कुंजबन गणेश मंडळ, गरुड झेप गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ आदी मंडळांनी फुलांनी सजविलेल्या वाहनातून गणरायाला मिरवणूक काढून ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत जड अंतकरणाने निरोप दिला.
विसर्जन मिरवणूक मार्गावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे, गणेश महासंघासह विविध राजकीय तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने सहा ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टेजवर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
गणपती विसर्जन मिरवणुकीत सिद्धी विनायक गणेश मंडळाच्या महिलांनी सनई-चौघडा व टाळ-मृदंगांच्या निनादात पावली खेळत अनेकांचे लक्ष वेधले. याचबरोबर मिरवणुकीत सहभागी झालेल्या तीसगाव येथील रणसंग्राम क्रीडा मंडळातील ढोल, झांज तसेच लेझीम पथकाच्या मुला-मुलींनी चित्तथरारक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर शिवपुत्र प्रतिष्ठान मंडळाच्या २१ फूट उंचीच्या गणपतीने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले. या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरू झालेल्या रिमझिम पावसात गणेश मंडळाच्या ढोल-ताशांचे प्रात्यक्षिक तसेच लेझीमच्या कवायती पाहण्यासाठी अनेकांनी कुटुंबासह गर्दी केली होती. यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त संजय सानप, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह १ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक असे १० पोलिस अधिकारी, ६४ पोलिस अंमलदार तसेच २१ महिला अंमलदार, आरपीसी, अतिदक्षता दल तसेच २९ होमगार्ड आर्दीच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
गणरायांचे विसर्जन करताना गर्दी होऊ नये यासाठी वाळूज महानगर परिसरात बजाजनगर येथे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाजव-ळील एमआयडीसीची सार्वजनिक विहीर, वडगाव येथील पाझर तलाव तसेच वडगावच्या जलकुंभाजवळील खदान, जो-गेश्वरी (रामराई) येथील लघुसिंचन तलाव, सिडको कार्यालयासमोरील सार्वजनिक विहीर, घाणेगाव येथील पाझर तलाव, तीसगावच्या खवड्या डोंगराची उत्तर बाजु तसेच साजापूर येथील पाझर तलाव अशा ८ ठिकाणी मश्रीफ्चे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.