Fraud Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | डॉक्टरला नोकरीचे आमिष, व्हीव्हीआयपीला लग्रात आणण्यासाठीही उकळले पैसे

Chhatrapati Sambhajinagar | तपास भरकटला : नॅशनल थ्रेडवर प्रश्नचिन्ह, फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही गुंता

पुढारी वृत्तसेवा

  • डॉ. निखिल भाकरे यांना NMC नोकरीच्या नावाखाली कल्पना भागवत व डिम्पी हरजाई यांनी ५० हजारांची फसवणूक केली.

  • पुण्यातील लग्नात VVIP प्रवेशासाठी १ लाख रुपये उकळल्याचे उघड झाले.

  • कल्पना भागवत, डिम्पी हरजाई आणि मोहम्मद अशरफ यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

  • तपासात आयबी-एटीएसने चौकशी केली तरी ठोस पुरावे न सापडल्याने तपास भरकटत असल्याचे चित्र आहे.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

राजस्थानच्या उदयपूर येथील डॉ. निखिल भाकरे यांना नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) मध्ये नोकरीचे आमिष दाखवून तोतया आयएसएस कल्पना भागवत, डिम्पी हरजाईने ५० हजारांचा चुना लावला. तर पुणे येथील सुधाकर जाधवर यांच्या मुलीच्या लग्नात व्हीव्हीआयपींना घेऊन येण्याच्या बदल्यात १ लाख रुपये या टोळीने उकळल्याचे समोर आले आहे.

शनिवारी मुख्य आरोपी कल्पना भागवतची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पोलिसांनी दत्तात्रय पांडुरंग शेटे (३८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) याला अटक केली होती. पोलिस कोठडीत शेटेकडून सिडको पोलिसांना काहीही नवीन माहिती काढता आली नाही. मंगळवारी (दि.९) शेटेसह गृहमंत्र्यांच्या तोतया ओएसडी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (३०, रा. नवी दिल्ली) आणि अफगाणी मोहम्मद अशरफ आदिना खील (२४, रा. दिल्ली) या तिघांना न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत १२ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

दरम्यान, एकीकडे फसवणुकीची व्याप्ती वाढत असताना, दुसरीकडे नॅशनल थ्रेड आणि मोबाईल डेटा रिकव्हरीमध्ये पोलिसांच्या हाती ठोस काहीच न लागल्याने तपास भरकटत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रारंभी आयबी, एटीएसने आरोपींची कसून चौकशी केली. मात्र, त्यांनीही यातून अंग काढून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयात सेक्रेटरी पदासाठी सेटिंग शिर्डी येथील मनोज लोढा यांच्या जबाबानुसार, त्यांना दिल्ली येथील एकाने फोन करून २०२७-१८ साली आयएएस कल्पना भागवत या शिर्डी येथे दर्शनासाठी येणार असल्याने त्यांची सोय करण्यास सांगितले होते. शिर्डीत त्यांची तिच्याशी भेट झाली.

तिने स्वतःला आयएएस २०१७ साली झाल्याचे सांगून अपघातांमुळे जॉईन केले नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने मोबाईलमध्ये काही व्हिडीओही त्यांना दाखविले. २०२१ साली दत्तात्रय शेटेसोबत लोढा यांची जमीन खरेदीच्या संदर्भात ओळख झाली होती. त्याने दिल्ली पर्यंत कनेक्शन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी कल्पना पुन्हा शिर्डीला आली होती. तिने लोढा यांना तिची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सेक्रेटरी पदाच्या जॉइनिंगचे काम सुरू असल्याचे सांगून ते कोणी करून देईल का असे विचारले होते. तेव्हा त्यांनी शेटे सोबत कल्पनाची ओळख करून दिली होती. शेटेने तिचे काम करून देण्याची हमी दिली होती असे लोढा यांनी जबाबात म्हटले आहे. दरम्यान, शेटेने बोगस आयएएसची यादी कुठे बनवली हे सिडको पोलिस त्याच्याकडून अद्याप वदवून घेऊ शकले नाहीत.

हॉस्पिटलच्या इव्हेन्टचा खर्च सांगितला

२० लाख डॉ. निखिल भाकरे यांच्या जबाबानुसार, ते २०२४ मध्ये मंगल हॉस्पिटल, उदयपूर (राजस्थान) येथे नोकरी करत असताना मुख्यमंत्री आयुष्यमान योजना मिळाली होती. त्यादरम्यान, कल्पना भागवत सोबत त्यांची ओळख झाली होती. तिने दिल्ली येथे आयएएस असल्याचे सांगितले होते. भाकरे यांना हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती हवी असल्याने त्यांनी कल्पनाशी चर्चा केली होती.

तेव्हा तिने प्रथम जागेची पाहणी करावी लागेल असे सांगून विमानाचे तिकीट काढायला लावले. तिथे जाऊन तिने डॉ. भाकरेंकडून इव्हेन्टसाठी २० लाखांचा खर्च सांगितला होता. त्यामुळे त्यांनी नकार दिला होता. मात्र, त्यांच्याकडून नॅशनल मेडिकल कमिशन येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कल्पना आणि डिम्पीने ५० हजार उकळले असल्याचे तपासात समोर आले आहे.

दिल्लीत डिम्पीला नेऊन घेतली घरझडती

सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्या पथकाने आरोपी डिम्पी हरजाई याला दिल्ली येथे नेऊन त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी पासपोर्ट जप्त केला आहे. दरम्यान, डिम्पीला न्यायालयात हजर केले तेव्हा त्याचे आई-वडील, भाऊ अगोदरच तिथे हजर होते. कुटुंबीय डिम्पीठी जप, प्रार्थना करताना दिसले.

मोबाईलचा डिलीट डेटा रिकव्हर होईना

या प्रकरणात सिडको पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या पाचही आरोपींनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या प्रकरणात पोलिसांना मोबाईल डेटा रिकव्हर करता आलेला नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT