Fake gold fraud case Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Fake gold fraud case : बनावट सोन्यावर बारा लाखांचा डल्ला!

बजाज फायनान्सचा शाखा व्यवस्थापकच निघाला मास्टरमाइंड

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : बजाजनगर येथील बजाज फायनान्स गोल्ड लोन शाखेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, शाखा व्यवस्थापकानेच बनावट सोन्यावर तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली असून, सोमवारी (दि. १६) संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाखा व्यवस्थापक सदाशिव मुरलीधर डोईफोडे (रा. संभाजी कॉलनी, दत्तमंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर) आणि बनावट ग्राहक राजकुमार खंदारे (रा. गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराणा प्रताप चौकाजवळील बजाज फायनान्स गोल्ड लोन शाखेत डोईफोडे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मात्र ते अचानक चार-पाच दिवस अनुपस्थित राहिल्याने शाखेकडून २ जानेवारी रोजी वरिष्ठांना याची माहिती देण्यात आली.

यानंतर एरिया मॅनेजर कन्हैयालाल आहिर, ऑडिटर सुनील भालेराव तसेच कर्मचारी निकिता जैस्वाल आणि गणेश गाडे यांनी स्ट्रॉग रूममधील सोन्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान एका पाऊचमध्ये बनावट सोने आढळून आले.

चौकशीत उघड झाले की, २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी डोईफोडे यांनी एका व्यक्तीकडून घाईगडबडीत पाऊच स्वीकारून तो स्वतः स्ट्राँग रूममध्ये ठेवला होता. यावेळी त्यांनी कोणतीही माहिती न देता कर्मचारी निकिता जैस्वाल यांच्याकडून गोल्ड लोन फाईलवर स्वाक्षरी घेऊन कर्ज मंजूर केले.

तपासात असेही समोर आले की, डोईफोडे यांनी बनावट ग्राहक तयार करून खोटे सोने ठेवत ११ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर केली. याप्रकरणी एरिया मॅनेजर कन्हैयालाल आहिर यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बनावट सोन्यावर ११.९० लाखांचे कर्ज

  • शाखा व्यवस्थापकानेच केला गैरव्यवहार

  • बनावट ग्राहक तयार करून कर्ज मंजूर

  • २७ डिसेंबर २०२५ रोजी बनावट सोने स्ट्रॉग रूममध्ये ठेवले

  • जानेवारी रोजी तपासणीदरम्यान प्रकार उघड

  • ११ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT