Extend the deadline for the Gunthewari concession by another two months!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गुंठेवारीअंतर्गत खुल्या भूखंडांच्या बेटरमेंट शुल्कात देण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांची महापालिकेत गर्दी होत असतानाच या सवलतीची मुदत आणखी दोन महिने वाढविण्याची मागणी शुक्रवारी (दि.१८) सर्वसाधारण सभेत करण्यात आली. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकानेच हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सध्या ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याने त्यानंतरच पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या प्रबोधनकार केशव ठाकरे सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नगरसेवक राजू वैद्य यांनी गुंठेवारीच्या मुदतवाढीचा विषय सभागृहात मांडला. तसेच खुल्या भूखंडांच्या बेटरमेंट शुल्कातील ५० टक्के सवलतीची मुदत संपल्यानंतर महापौरांनी एक महिन्याची मुदतवाढ दिली.
त्याबद्दल अभिनंदन करावे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आता आणखी दोन महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची मागणी केली. यासह गुंठेवारी कक्षाबाहेरील गर्दीचा प्रश्नही सभेत उपस्थित झाला. बालाजी मुंडे यांनी चलन भरण्यासाठी एकाच बँकेची सुविधा असल्याने तेथे नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे सांगितले. तसेच अधिकाधिक बँकांमध्ये चलन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे यांनी गुंठेवारी कक्षातील कर्मचारीसंख्या वाढविण्याची मागणी केली. तर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या तसेच शासकीय जागांवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा प्रश्नही वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी मांडला. अशा नागरिकांची घरेही गुंठेवारीअंतर्गत नियमित करण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासाठी यापूर्वी अनेकदा मागणी करूनही अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सभेत नगरसेवकांच्या विविध मागण्यांवर महापौर राजूरकर यांनी सध्याची ३० ऑक्टोबरची मुदत आहे. त्यामुळे हि मुदत संपल्यानंतरच पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तर गुंठेवारी प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या इतर अडचणी सोडविण्याचेही त्यांनी सांगितले.
सभागृहात प्रशासनाचे अभिनंदन
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगरने देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात १६ वा क्रमांक मिळविल्याबद्दल सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. यापूर्वी शहराचा क्रमांक ३४ वा होता. या कामगिरीबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्यासह महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव माजी महापौर रशीद मामू यांनी मांडला. या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक राजू वैद्य, शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे आणि सभागृहनेते गोविंद केंद्रे यांनी अनुमोदन दिले.