राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील ईएसआयसी हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डाचे स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी (दि.१५) लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेचच गरज नसताना ऑपरेशन झालेल्या रुग्णांना आयसीयूत टाकल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मात्र डॉक्टरांनी पोस्ट ऑफ केअरसाठी त्या रुग्णांना आयसीयूची गरज होती, असे सांगितले. दरम्यान, या प्रकाराने रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य कामगार विमा योजना सोसायटी रुग्णालय म्हणजेच चिकलठाणा येथील ईएसआयसी हॉस्पिटलमधील १० खाटांची आयसीयू वॉर्ड अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहे. यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्याने या सुविधा तत्काळ सुरू कराव्यात, यासाठी बुलंद छावाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश असल्याने शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी येथील आयसीयू वॉर्डाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लगेचच आयसीयूत एका १२ वर्षांचा मुलगा जो की आठवड्याभरापासून दाखल होता.
त्याचे अॅपेंडिक्सचे ऑपरेशन गुरुवारी झाले होते. त्याला आयसीयूत दाखल केले. दुसरे ७० वर्षीय वृद्ध आजोबांचेही आदल्या दिवशी ऑपरेशन झाले असताना त्यांनाही आयसीयूत दाखल केले. अचानक आयसीयूत दाखल केल्याने हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरले.
त्यांना डॉक्टरांकडून स्पष्ट उत्तर मिळत नव्हते. १२ वर्षीय रुग्ण घाबरल्यामुळे सारखा रडत होता. शेवटी रात्री त्याला आधीच्या वॉर्डात शिफ्ट करण्यात आले. तर आजोबांना संधीवाताचा त्रास सुरू झाल्याने मुलाच्या वारंवार विनवणीनंतर रविवारी दुपारी जनरल वॉर्डात हलवण्यात आले. या प्रकाराने हॉस्पिटलमधील रुग्णांमध्ये आणि नातेवाइकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
आयसीयूत उत्तम काळजी १५ ऑगस्ट रोजी आयसीयूचे उद्घाटन करावे, अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून होत्या. त्यानूसार आयसीयू रुग्णसेवेसाठी खुले केले. पोस्ट ऑफ केअरसाठी त्या रुग्णांना आयसीयूत दाखल केले होते. आयसीयूमध्ये रुग्णांच्या तब्येतीची उत्तम काळजी घेतली जाते.- डॉ. सचिन फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयसी
डॉक्टर, नर्सवर कारवाई करावी उद्घाटनानंतर लगेच जनरल वॉर्ड मधील तीन पेशंट आयसीयू मध्ये अॅडमिट केले. त्यातील पेशंट एक मुलगा व एक मुलगी यांना सायंकाळी परत जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत आयसीयूमध्ये येण्यासाठी डॉक्टरांनी आग्रह सुरू होता. यामुळे नर्सवर कारवाई करण्यात यावी.सुरेश वाकडे पाटील, कामगार नेते.
तब्येत चांगली असताना मुलाला, वडिलांना आयसीयूत टाकले माझा मुलगा आणि वडील दोघे रुग्णालयात दाखल आहेत. मुलावर १४ ऑगस्टला अॅपेंडिक्सचे ऑपरेशन झाले. वडीलांचे त्याच दिवशी ऑपरेशन झाले. दोघांची तब्येत चांगली असताना शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक त्यांना उद्घाटन झालेल्या आयसीयूमध्ये शिफ्ट केले. त्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो. मुलगा सारखा रडत होता. परंतु कुणी ऐकायला तयार नव्हते. तब्बल ७-८ तास रडवल्यावर संध्याकाळी त्याला परत जनरल वॉर्डमध्ये आणले, तर वडिलांना रविवारी दुपारी परत जनरल वॉर्डात पाठवले.विलास पवार, रुग्णाचे नातेवाईक.