Encroachments in Kabadi Pura-Rauf Colony were removed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मनपा निवडणुकीनंतर महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्यात आली असून मनपा पथकाने गुरुवारी (दि. २२) कबाडीपुरा रउफ कॉलनी परिसरातील जुन्या व दाट लोकवस्तीतील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागील शासकीय जागेवर उभारलेली २२ अनधिकृत घरे भुईसपाट केली. या कारवाईमुळे परिसरातील अरुंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या या भागात अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर कच्ची व पक्की स्वरूपातील घरे बांधण्यात आली होती. वाढत्या अतिक्रमणामुळे या परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद झाले होते. त्यामुळे अम्ब्युलन्स, अग्निशमन दल तसेच इतर आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
मनपाकडून या अतिक्रमणधारकांना वैध कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. तसेच घरातील साहित्य हलविण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र कोणतीही कागदपत्रे सादर न करण्यात आल्याने मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार गुरुवारी मनपा पथकाकडून अतिक्रमित घरे हटवण्यात आली.
यावेळी अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनात दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईला काही नागरिकांनी विरोध दर्शविला. मात्र पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व उपायुक्त सविता सोनवणे यांनी त्यांच्याशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. ही कारवाई सहायक आयुक्त सागर देशमुख, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, संजय सुरडकर, सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई यांच्यासह अधिकारी-कर्मचार्यांची उपस्थिती होती.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहाणार
या परिसरात मागील सहा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून, आजची कारवाई हा त्याचाच एक भाग आहे. यापुढेही शासकीय जागेवरील अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.