Eleven people, including two children, seriously injured in a dog attack
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा
गंगापूर शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने थैमान घालत दोन लहान मुलांसह एकूण ११ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत कुत्र्याला ठार केले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
ही घटना ५ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्वप्रथम तीन वर्षीय बालकावर हल्ला केल्यानंतर कुत्र्याने राजीव गांधी चौक, पोलिस स्टेशन परिसर व अन्य ठिकाणी फिरून नागरिकांवर हल्ले केले. पोलिस स्टेशनजवळील एका मिस्त्रीला आणि शिवराज गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी कुत्र्याचा बंदोबस्त केला. जखमींमध्ये सोहेल सिराज शेख (२७, काजीपुरा), अनिकेत नवनाथ काळे (१२), सुबेरा अफसर शेख (५), अशोक कारभारी चव्हाण (६०), शिवराज सुभाष गायकवाड (२५) यांचा समावेश आहे. काहींना चेहऱ्याच्या भागाला चावा बसल्याने एकाचा डोळा थोडक्यात वाचला.
दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सर्व जखमींवर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विशाल सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.