निवडणुकीची रणधुमाळी, थंडीची लाट अन् व्हायरल साथीचा फैलाव Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

निवडणुकीची रणधुमाळी, थंडीची लाट अन् व्हायरल साथीचा फैलाव

आरोग्य, वैद्यकीय अधिकाऱ्यांची आज पुण्यात राज्यस्तरीय बैठक

पुढारी वृत्तसेवा

Election campaign, cold wave and spread of viral pandemic

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच शहरात कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, सध्या शहरात घराघरात सर्दी-खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहेत.

खासगी दवाखाने, रुग्णालये, मनपाची आरोग्य केंद्रे तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, या पार्श्वभूमीवर आज सोमवारी ड (दि.१२) पुणे येथे राज्यस्तरीय आरोग्य व वैद्यकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या शहरातील किमान तापमान दहा अंशांपर्यंत घसरले असून, पहाटे व रात्री प्रचंड गारठा जाणवत आहे. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून प्रभागांमध्ये प्रचार रॅली, पदयात्रा, जाहीर सभा, कॉर्नर बैठका मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात असून, ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.

राजकीय वातावरण तापलेले असले, तरी हवामानातील बदल आणि गर्दीमुळे आजार पसरण्याची शक्यता वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. अचानक सर्दी-खोकला, तापासह अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी यासारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

अनेक रुग्णांना तोंडाची चव जाणे, अशक्त-पणा जाणवत असून, उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी हा आजार व्हायरल असल्याचे सांगण्यात येत असून, त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जात असल्याचेही समोर येत आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली असून, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

निवडणुकीची धामधूम, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

शहरात सध्या व्हायरलची साथ सुरू असल्याने मास्कचा वापर करावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत, घरात शिजवलेले ताजे अन्न घ्यावे, पाणी उकळून प्यावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत, साबणाने वारंवार हात धुवावेत तसेच अंथरूण-पांघरूण वेगळे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे राजकीय प्रचाराचा जोर वाढत असताना, दुसरीकडे थंडीची लाट आणि वाढते आजार यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवडणुकीच्या गदारोळात आरोग्याबाबत नागरिकांनीही तितकीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT