Elderly man swindled out of 74,000 rupees under the pretext of offering help
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एटीएममधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने एका भामट्याने वृद्धाचे कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७४ हजार ५०० रुपये काढून घेतले. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी बाबर कॉलनी येथील एसबीआयच्या एटीएममध्ये घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल लतीफ अब्दुल करीम शेख (७८, रा. कटकटगेट) हे ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास या परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पहिल्या प्रयत्नांत एटीएममधून पैसे मिळाले नाहीत. दुसऱ्या प्रयत्नांत चार हजार रुपये काढले.
पुन्हा व्यवहार करण्यासाठी ते एटीएम मशीनजवळ असताना याच दरम्यान एक ३५ वर्षीय अनोळखी तरुण तेथे आला. त्याने आपल्याला लवकर जायचे असल्याचे सांगत शेख यांना बाजूला होण्यास सांगितले. अब्दुल लतीफ हे बाजूला होत असतानाच भामट्याने व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे सांगून पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगितले.
कार्डची आदला बदली
शेख यांनी कार्ड मशीनमध्ये टाकले. याचवेळी तरुणाने हातचलाखीने त्यांचे मूळ कार्ड काढून स्वतःजवळ ठेवले आणि दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले. आपले कार्ड बदलल्याचे लक्षात न आल्याने शेख घरी परतले. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर खात्यातून ७४ हजार ५०० रुपये काढल्याचा मॅसेज आले.
त्यांनी एटीएममध्ये जाऊन तपासणी केली असता कार्ड ब्लॉक असल्याचे दिसले. त्यानंतर बँकेत जाऊन कार्डची पडताळणी केली असता, त्यांच्या हातातील कार्ड दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे अब्दुल लतीफ अब्दुल करीम शेख यांना धक्काच बसला त्यांनी तातडीने पोलिसात जात तक्रार दिली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार हगवणे करीत आहेत