छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर त्याचा ताफा येताच एका नशेखोराने बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. बंदोबस्तावरील पोलिसांनी हुज्जत घातली. या नशोखोराला सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. हा प्रकार रविवारी मध्यरात्री पैठण रोड, लिंकरोड परिसरात घडला.
सौरभ अनिल भोले (रा. संसार नगर, क्रांती चौक) असे गोंधळ घालणाऱ्या नशेखोराचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी सोमवारी (दि.२१) दिली.
अधिक माहितीनुसार, पालकमंत्री संजय शिरसाट हे रविवारी रात्री विविध कार्यक्रम आटोपून रात्री पैठण लिंक रोडवरील त्यांच्या बंगल्याकडे निघाले होते. दहाच्या सुमारास ताफा बंगल्याच्या गेटवर येताच आरोपी भोले हा नशेत धुंद होऊन ताफ्यात शिरला. त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. ताफ्यासोबत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला बंदोबस्तावरील पोलिसांनी पकडले. मात्र, तो पोलिसांना देखील आवरत नव्हता. हुज्जत घालून त्याने गोंधळ घातला. त्याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस अंमलदार आकाश पोलसाने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.