Drug trafficking : मराठवाड्याच्या मुळावरच अंमली पदार्थांचे सावट; ड्रग्‍स तस्‍करांकडून शाळा, कॉलेजमधील तरूण टार्गेट File Photos
छत्रपती संभाजीनगर

Drug trafficking : मराठवाड्याच्या मुळावरच अंमली पदार्थांचे सावट; ड्रग्‍स तस्‍करांकडून शाळा, कॉलेजमधील तरूण टार्गेट

मराठवाड्यात मोठे रॅकेट, ड्रग्‍स तस्‍कर, पेडलर्सकडून तरूणांना नशेच्या दरीत ओढले जात आहे. समाजव्यवस्‍था धोक्‍यात

निलेश पोतदार

Drug trafficking has increased in Marathwada

छत्रपती संभाजीनगर : प्रमोद अडसूळे

मराठवाड्याच्या मुळावरच अंमली पदार्थांचे सावट घोंगावत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. तुळजापूर येथील मंदिर परिसरातील पुजाऱ्याने ड्रग्ज विक्री सुरू केल्यापासूनच सुरुवात झालेला हा धंदा लातूरच्या रोहिणा या अतिदुर्गम गावातील ड्रग्ज कारखान्यापर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाइंड पोलिस हवालदार होता.

प्रमोद केंद्रे या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल १७ कोटींचे ‘मेफेड्रोन’ बनवण्याचा अड्डा थाटला होता. तर तुळजापूर प्रकरणात मुंबई येथील तस्कर संगीता गोळे आणि तिचा पती वैभव, दीर अभिनव हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे उघड झाले. शहरात धोका वाढल्याने ड्रग्स तस्करांनी ग्रामीण भागाला टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.

या घटनेने एक गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. जे कायद्याचे रक्षक आहेत, तेच जर राक्षस बनून तरुण पिढीला अंधारात ढकलत असतील, तर सामान्य नागरिक कुणाकडे पाहणार? डीआरआयने छापा टाकून ११ किलो ६६ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आणि ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. ही घटना काही अपवाद म्हणून दुर्लक्ष करण्यासारखी नाही. याआधी २०२३ मध्येही छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज कारखाने सापडले होते.

चौघांना बेड्या ठोकून २५० कोटींचे एमडी ड्रग्स आणि पैठण एमआयडीसीमधून १६० कोटींचा मेफेड्रोन द्रव जप्त करण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे देखील पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये ड्रग्सचा पुरवठा मुंबईहून होत असल्याचे अनेक पेडलरच्या अटकेनंतर उघड झाले होते. मात्र, यांची साखळी शोधण्यात पोलिसांना अपयश आले. शहरी भागाप्रमाणेच आता मागास मानल्या जाणाऱ्या गावांमध्येही नशेखोरी, गुन्हेगारी वाढू लागली आहे.

बटन गोळ्यांपासून ते मेफेड्रोनसारख्या महागड्या ड्रग्जपर्यंत सर्व काही सहज उपलब्ध होत आहे. आता केवळ मुंबई, पुणे, दिल्ली किंवा बेंगळुरूच नाही, तर ग्रामीण भागही या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडला आहे. ड्रग्स तस्करांचे टार्गेट शाळा, कॉलेज परिसरातील तरुण आहेत. पेडलर्स एका गुप्त पद्धतीने त्यांना नशेच्या दलदलीत ओढतात. एकदा का नशेची सवय लागली, की गुन्हेगारी वाढते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेच्या प्रभावाखाली हल्ले, चाकू मारामारी, हत्या यांसारख्या घटना घडल्या आहेत. मैदाने, बागा या अड्ड्यांमध्ये ‘बटन गोळ्या’ सहज मिळत असून, एका गोळीची किंमत १०० ते १५० रुपये आहे. काही जण त्या एनर्जी ड्रिंकमध्ये टाकून नशा वाढवतात. गांजा तर शहरासह ग्रामीण भागात देखील सहज मिळतो. काही मेडिकल चालक तर नशेचा बाजार करणाऱ्यांना सिरप पुरवीत असल्याचे कारवायांवरून समोर आले आहे. पैशासाठी तरुणाई नशेच्या विळख्यात ढकलणाऱ्या या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्तांनी अँटी नार्कोटिक्स सेल स्थापन केले असले, तरी अजून खूप काही करणे बाकी आहे. ग्रामीण भागातील पोलिसांना देखील आता चोरी, गुन्हेगारी रोखण्यासोबत अंमली पदार्थ तस्करांचे जाळे तोडण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. मुख्य तस्करांपर्यंत पोहोचून साखळी मोडावी लागेल. अन्यथा मराठवाड्याचा तरुणपणा कायमचा हरवण्याची भीती निर्माण झाली आहे.

गुन्हेगारांमध्ये व्यसनाधीनता प्रमुख कारण

व्यसनाधीन व्यक्ती गुन्हेगारीकडे वळतो हे आजवरच्या अनेक प्रकरांवरून स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगरात पाच-पाच बटन गोळ्यांची नशा करून तरुणाचे मित्रालाच भोसकून संपविले होते. त्याने काय केले हे त्याला देखील नशेच्या धुंदीत समजले नाही. नशेखोर क्षुल्लक कारणावरून थेट चाकूहल्ले करतात. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना ठोस उपायोजना राबविण्याची गरज आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बायपासवरील नामांकित महाविद्यालयाच्या बाजूलाच एका उद्योजकाचा फॉरेन रिटर्न पोरगा ओजी कुश हा विदेशी गांजा विक्री करताना पकडला होता. मात्र, त्याच्यावर पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील अशा प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होते.

जेलमधून नशेचा धंदा

छत्रपती संभाजीनगर येथे फैजल तेजा हा कुख्यात आरोपी हर्सूल जेलमधून नशेचा बाजार चालवीत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जेलमधून सुटून आलेल्या अजय ठाकूरने देखील जेलमधूनच नशेचा व्यवसाय सुरु केल्याचे समोर आले. तो जेलमधून पंटर मार्फत पत्नीला मालाचा पुरवठा करत होता. एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने फेब्रुवारीत ठाकूरच्या घरी छापा मारून त्याच्यासह पत्नीला गांजा, नशेच्या गोळ्याच्या साठ्यासह अटक केली होती.

गेल्या सहा वर्षांपासून दोघेही हा धंदा करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे जेलमधून ऑपरेट होणाऱ्या टोळ्या, नशेचे धंदे बंद करणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. अजय ठाकूर दाम्पत्यासह सहा आठ जणांच्या टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोक्काची कारवाई केली. टोळीतील काहीजण बटन गोळ्यासह कुख्यात गांजा तस्करीच्या धंद्यात पटाईत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT