

Job Threat Case
पैठण : पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी बाल विकास प्रकल्पाच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.6) एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील विविध गावामध्ये अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्याची भरती प्रक्रिया झाली आहे. अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी लक्ष्मण नारायण काळे (रा.चांगतपुरी ता.पैठण) यांनी मंगळवारी रोजी पंचायत समिती येथील महिला एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योत्सना उंदलसिंग गहरवार यांच्या कार्यालयात येऊन पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती संदर्भाचा मला आदेश द्या, असे म्हणून दमदाटी शिवीगाळ करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
याप्रकरणी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योत्सना उंदलसिंग गहरवार यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे हे करीत आहे.