छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एमआयएमचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत शहरातील १५ माजी नगरसेवक तसेच विविध जिल्ह्यांतून आलेल्या एमआयएमचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
जटवाडा रोड येथील एवरेस्ट शैक्षणिक संस्था येथे गुरुवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे व शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस डॉ. गफ्फार कादरी यांनी प्रास्ताविकात मी सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय विचारपूर्वक व सर्वांनुमते घेतल्याचे सांगितले.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाचा उल्लेखही केला. वक्फच्या बाबतीमध्ये अजित पवार यांच्यावर टीका करणारे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी व इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली. वक्फ प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये मोर्चे काढून नंतर अॅडजेस्टमेंट करून गप्प बसने हा त्यांचा धंदा आहे. म्हणून त्यांना अजित पवारांबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही, असेही कादरी म्हणाले.
अजित पवार यांनी डॉ. कादरी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामाची प्रशंसा केली. नवीन प्रवेश घेणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना योग्य मान, सन्मान व संधी देऊ असे आश्वासन दिले. या कार्यक्रमांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, डॉ. उमर कादरी, सय्यद जीब्रान कादरी, शेख अब्दुल नदीम, माजी नगरसेवक अजीज खान गनी खान, अबूबक्कर अमोदी व शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.