

Car carrying beef seized, three arrested
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका कारमधील मागील डिक्कीमधून गौवंशाचे मांस नेताना एका गौरक्षक महिलेने पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. १६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावरील भवन गावाजवळील पूर्णा नदीच्या पुलावर करण्यात आली. यावेळी रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर महिला गौरक्षकाच्या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अस्लम युसूफ कुरेशी, सलमान वाहब सय्यद, सय्यद मोईन सय्यद अजीम तिघे रा. जैनोद्दीन कॉलनी, सिल्लोड असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरकडे कारमधून क्र. (एमएच ०१, बीटी ५५७७) गौवंशाचे मांस नेत असल्याची माहिती महिला गौरक्षक नयना सुभाष राजपूत (रा. बजाजनगर वाळूज, छत्रपती संभाजीनगर) यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून महिला गौरक्षकाने पूर्णा नदीजवळ कार अडवून मागची डिक्की उघडली असता गौवंशाचे मांस मिळून आले. महिला गौरक्षकाने ११२ नंबरवर संपर्क साधत ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच वडोदबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल दयानंद वाघ, धनराज खाकरे यांनी धाव घेत कारसह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी महिला गौरक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांविरोधात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.