Don't keep the Municipal Corporation in debt Thackeray Sena
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पाणीपुरवठा योजनेच्या स्वहिस्स्यासाठी हुडकोने महापालिकेला ८२२ कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. लवकरच ते प्राप्तही होणार आहे. आता ड्रेनेजच्या स्वहिस्स्यासाठी २५० कोटींचे पुन्हा एक कर्ज काढले जाणार असून, महापालिकेला कर्ज बाजारी करून ठेवू नका, असे म्हणत या दोन्ही कर्जाना शिवसेना ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे.
केंद्र व राज्य शासनाने शहरासाठी अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. परंतु असे असले तरी या योजनेत महापालिकेला स्वहिस्साचे ८२२ कोटी रुपये टाकायचे आहेत. नाजूक आर्थिक स्थितीमुळे हा निधी अद्यापही महापालिकेला स्वबळावर उभा करता आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या हुडको या संस्थेकडून कर्ज घेतले आहे.
या कर्जाच्या परतफेडीसाठी प्रशासनाला दरमहा १० कोटी रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यात आता ड्रेनेज योजनेच्या कामासाठी आणखी २५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी या दोन्ही कर्जाना विरोध केला आहे. कर्जाची परतफेड करावी की, कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. त्यामुळे महापालिकेला कर्जबाजारी करून ठेवू नका, असे म्हणत वैद्य यांनी कर्जाना विरोध केला आहे.
मनपा कर्जबाजारी करण्याचा डाव महापालिका कर्जबाजरी करून टाकण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे. अगोदर पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपये कर्ज काढले. आता ड्रेनेजलाईनसाठी २५० कोटींचे कर्ज काढले जात आहे. मनपावर कर्जाचे डोंगर तयार केला जात आहे. मागील ५ वर्षांत कर वसुलीतून उपलब्ध झालेल्या पैशाचे काय केले, याची चौकशी करावी लागेल. आताच कर्मचाऱ्यांचे पगार करणे डोईजड जात आहे. कर्जाचे हप्ते सुरू झाल्यावर पगार करणेच काय तर साधे ड्रेनेज चोकअप सुध्दा काढणे मुश्कील होईल.राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)