Ramdas Athawale : हक्क मिळत नसेल तर हिसकावून घेणार

गायरान जमीन हक्क परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा निर्धार
Ramdas Athawale
Ramdas Athawale : हक्क मिळत नसेल तर हिसकावून घेणार File Photo
Published on
Updated on

Gairaan Land Rights Council Union Minister Ramdas Athawale

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्षे गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या ताब्यातून या जमीन सरकार काढून घेत आहे. गायरान जमिनीवरील आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. तो मिळत नसेल तर तो हिसकावून घेतला जाईल, असे प्रतिपादन रविवारी (दि.१२) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते गायरान हक्क परिषदेत बोलत होते.

Ramdas Athawale
Sambhajinagar Water Supply : शहराची २४ वर्षांची प्रतीक्षा संपणार, २५०० च्या जलवाहिनीतून डिसेंबरमध्ये पाणीपुरवठा

संत एकनाथ रंगमंदिरात रविवारी (दि.१२) रिपाइंच्या वतीने गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, मिलिंद शेळके, दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेत भाषणाची सुरुवात मी घेतो. माझ्या भीमाची आण, तुम्हाला मिळवून देतो गायरान, या शिघ्र कवितेने केली. यावेळी त्यांनी गायरान जमिनी १९९० नाही तर २०१४ पर्यंत ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवली. यावेळी जिल्हाभरातून गायरान जमिनी कसणारे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

समिती नेमावी

राज्यातील भूमिहीनांना गायरान जमिनी द्याव्यात, तो कोणत्याही जातीचा असो, अशी भूमिका रिपाइंची असून, राज्यातील भूमिहीनांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी, अशी मागणी लवकरच महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिली,

Ramdas Athawale
Police Uniform : पोलिसांचा फक्त बूट नव्हे, संपूर्ण गणवेश बदला

कार्यक्रमांकडे प्रमुख मान्यवरांची पाठ

या कार्यक्रमाला प्रमुखांमध्ये पालकमंत्री तथा राज्याचे समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर या मान्यवरांनी गायरान हक्क परिषदेकडे पाठ फिरवल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

प्रसंगी जेलमध्ये जाऊ

गायरान जमिनीचा लढा आता तीव्र करण्यात येणार असून, या संघर्षासाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तर जाऊ परंतु हा हक्क मिळवूनच देऊ, असा विश्वासही पीडितांना दिला. दरम्यान, शासनाने गायरान जमिनीसह त्यांची घरे पाडली आहेत हे चुकीचे आहे. अतिवृष्टीत गायरान जमिनीवरील नुकसानीचेही पंचनामे करण्याचीही मागणी यावेळी केली.

संविधान मान्य नसणाऱ्यांना देशाबाहेर काढावे : आठवले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : हा देश संविधानानुसार चालतो. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा संविधानांवरील हल्ला आहे. ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, तसेच ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना देशाबाहेर काढावे, असे विधान केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत केले.

शहरात आयोजित गायरान परिषदेसाठी रविवारी आठवले आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपला देश डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. त्यामुळे येथे नेपाळ, बांगलादेशासारखी अराजकता निर्माण होणार नाही. काँग्रेसने संविधानांबाबत नेरीटिव्ह पसरवला आहे. त्यांचा नारा गरीबी हटावचा होता, परंतु देशातून गरीब हटले आहेत. भारताची इकॉनॉमी डेड झाल्याचे काँग्रेसच्या वतीने बोलले जाते, परंतु इकॉनॉमी नाही तर काँग्रेसच डेड झाली आहे. म्हणूनच त्यांना जन-तेने बाहेर फेकले असल्याची टिका आठवले यांनी केली.

मुंबईत मोर्चा

बिहारमधील महाबोधी-महाविहारच्या न्यासामध्ये सर्वच बौद्ध विश्वस्त करावेत, त्यासाठी १९४९ चा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज व भीमराज आंबेडकर हे तिघे वगळता रिपाइंचे सर्व घटक एकत्र येणार असल्याचा दावा मंत्री आठवले यांनी केला. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, पप्यू कागदे, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, किशोर थोरात, अरविंद अबसरमल, बाळकृष्ण इंगळे, दिलीप पाडमुक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news