छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच नवनिर्वाचित नगरसेवक अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. यातील काही जण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून दादागिरी करीत असल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. त्यामुळे हे दबंग नगरसेवक आता आयुक्त जी. श्रीकांत यांच्या रडारवर आले असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी (दि. १६) विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागाकडील कामांची माहिती घेत वसुलीबाबत विचारणा केली. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी नगरसेवकांकडून मिळत असलेल्या असभ्य वागणुकीबाबत आयुक्तांना माहिती दिली.
नगरसेवक शिवीगाळ आणि दादागिरी करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्त म्हणाले, जे नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतील, दादागिरी करतील, दाराला लाथ मारतील, टेबलवर हात आपटतील अशांच्या विरोधात सरकारी कामात अढथळा केल्याच्या कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. कोणत्याही नगरसेवकाची किंवा त्यांच्या नातेवाइकांची दादागिरी सहन करू नका, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नगरसेवक अधिकाऱ्यांच्या दालनात आलेच तर त्यांचे स्वागत करा, त्यांचे म्हणणे ऐका, ते नोंदवून घ्या, अशी सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.
पदाधिकाऱ्यांना मंजुरीप्रमाणेच कर्मचारी
महापौर, उपमहापौरांच्या कार्यालयात आकृतिबंधानुसार कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आकृतिबंधाव्यतिरिक्त कर्मचारी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.