Doctor duped of Rs 37 lakhs with lure of online trading
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात ऑनलाईन ट्रेडिंग आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. फेसबुकवर शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जोतीनगर भागातील एका ७१ वर्षीय ज्येष्ठ समाजसेविकेची तब्बल ३३ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर आता जवाहरनगर आणि क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत सायबर भामट्यांनी तरुण डॉक्टरसह एका खासगी नोकरदाराला तब्बल ३७ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
आयपीओचे आमिष; डॉक्टरला १४.८० लाखांचा फटका जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्या घटनेत, हेगडेवार रुग्णालयात कार्यरत असलेले रेडिओलॉजिस्ट विद्यार्थी डॉ. निखिल वसंत गांधी (२८, रा. मूळ चंद्रपूर) यांची १४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. डॉ. निखिल गांधी यांना व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड केले.
या ग्रुपमध्ये आधीपासूनच अनेक सदस्य आणि आठ अॅडमिन होते. हा ग्रुप 'इंडियन स्टॉक मार्केट ट्रेडिंग'चा असल्याचे भासवून, 'इनव्हेस्को' या नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करण्यात आला. सुरुवातीला त्यांनी ग्रुपवर शेअर आणि आयपीओच्या किमती टाकून नफ्याचे आमिष दाखवले. डॉ. गांधी यांनी सुरुवातीला छोटी रक्कम शेअरमध्ये गुंतवली, ज्यावर त्यांना थोडा नफाही देण्यात आला.
विश्वास बसल्यानंतर भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि कंपन्यांच्या (उदा. श्रीजी वॉटर अँड डिस्पोजेबल, डीएन ट्रेडिंग) बँक खात्यांवर २१ एप्रिल ते १३ मे २०२६ या काळात एकूण १४ लाख ८० हजार रुपये भरायला लावले. जेव्हा डॉ. गांधी यांनी नफ्यासह आपली मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भामट्यांनी नफा देण्यास नकार देत 'सर्व्हिस फी'ची मागणी केली.
'नफ्यातूनच फी कपात करा', असे सांगितल्यावर 'कंपनीची तशी पॉलिसी नाही, आधी फी भरा मगच पैसे मिळतील', असे सांगून आणखी पैसे उकळले. पैसे मिळाल्यावर भामट्यांनी त्यांना ग्रुपमधून काढून टाकले आणि आपले सर्व फोन नंबर बंद करून टाकले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.
खाजगी कर्मचाऱ्याची २२.५४ लाखांची फसवणूक
दुसऱ्या घटनेत, क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधामोहन कॉलनीतील रहिवासी कुलदीप दत्तात्रय पुरंदरे (४६) यांना 'फायर्स' कंपनीच्या नावाने फसवण्यात आले आहे. कुलदीप पुरंदरे यांना ६ डिसेंबर २०२५ रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअपवर लिंक आली. ती लिंक ओपन करताच ते 'फायर्स' नावाच्या एका व्यवसाय विषयक ग्रुपमध्ये जॉईन झाले. या ग्रुपची अॅडमिन 'नयना वर्मा' हिने त्यांना गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवले.
तिच्या सांगण्यावरून पुरंदरे यांनी त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील एका ग्राहक सेवा क्रमांकावर पाठवला. पुरंदरे यांनी ९ डिसेंबर रोजी सुरुवातीला गुगल पे द्वारे १५ हजार रुपये पाठवले, ज्यावर भामट्यांनी त्यांच्या नावाने 'फायर्स' कंपनीत उघडलेल्या एका बनावट खात्यात १६ हजार ५०० रुपये जमा झाल्याचे दाखवले.
हा १० टक्के वाढीव नफा पाहून पुरंदरे यांनी आणखी पैसे गुंतवले आणि त्यांच्या खोट्या खात्यात ९५ हजार रुपये जमा असल्याचे त्यांना दाखवण्यात आले. भामट्यांनी त्यांना बनावट आयपीओ सबस्क्रिप्शन नोटीस पाठवून ई टूई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि गॅबियन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपन्यांचे लाखो रुपयांचे शेअर्स लागल्याचे भासवले. या आमिषापोटी पुरंदरे यांनी आरटीजीएसद्वारे लाखो रुपये भामट्यांच्या खात्यात जमा केले.
त्यांच्या खोट्या डीएमए खात्यात १९ लाख रुपये जमा असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, ही मोठी रक्कम खात्यावर हवी असल्यास कमिशन चार्ज, सिक्युरिटी डिपॉझिट आणि लेट पेमेंट चार्जेस भरावे लागतील, असे सांगून भामट्यांनी पुरंदरे यांच्याकडून जानेवारी २०२६ मध्ये आणखी ४.०८ लाख, ३.७९ लाख उकळले. त्यांना ४४ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून भामट्यानी गंडा घातला. अखेर तब्बल २२ लाख ५४ हजार २३२ रुपये गमावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पुरंदरे यांच्या लक्षात आले. अधिक तपास क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे करत आहेत.
ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक टाळण्यासाठी घ्या ही काळजी
सोशल मीडियावरील किंवा व्हॉट्सअॅपवरील गुंतवणुकीच्या लिंकवर विश्वास ठेवू नका.
अनोळखी व्यक्ती किंवा ग्रुपच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका.
केवळ सेबी (SEBI) नोंदणीकृत संस्था किंवा अधिकृत ब्रोकर्समार्फतच गुंतवणूक करा.
मोठ्या परताव्याचे किंवा हमखास नफ्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून सावध राहा.
पॅन, आधार, बँक खाते, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.
गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी व प्लॅटफॉर्मची अधिकृत पडताळणी करा.
फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.