Cyber Crime | निवृत्त शिक्षकाला खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकवून 97 लाखांची सायबर लूट

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप-व्हिडिओ कॉल ; वृद्ध दाम्पत्याचे आयुष्यभराचे पैसे लुटले
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on
Updated on

सेलू : सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या साम्राज्याचे आणखी एक भयानक उदाहरण सेलूत उघडकीस आले, अज्ञात सायबर टोळीने निवृत्त शिक्षकाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल 97 लाख 83 हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, तपास यंत्रणांची भीती दाखवत आणि सतत व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे मानसिक दबाव निर्माण करत ही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नागनाथ शंकरराव कुरमुडले (वय 70, रा.मौलाना आझाद नगर, सेलू) यांना 4 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत विविध मोबाईल क्रमांकांवरून सातत्याने फोन व व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करण्यात आले. या कॉल्समध्ये आरोपींनी स्वतःला पोलीस, तपास अधिकारी किंवा सरकारी यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्यावर गंभीर आर्थिक गुन्हा नोंद झाला आहे, तुमच्या नावाने बँक खाते उघडून मोठा घोटाळा करण्यात आला आहे अशा खोट्या व भीतीदायक कथानकांची मालिका रचून फिर्यादी नागनाथ यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खिळवून ठेवण्यात आले.

आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले की, त्यांच्या आधार व पॅनकार्डचा गैरवापर करून मुंबईतील एका टॉवर शॉप व बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्या खात्यातून मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग आहे. तसेच तुम्हाला तात्काळ अटक होईल, तपासात सहकार्य करा अन्यथा कडक कारवाई होईल अशी धमकी देण्यात आली. यासोबतच ही बाब कोणालाही सांगितल्यास पेन्शन बंद करू आणि मुलाची नोकरी घालवू अशी थेट कौटुंबिक दबावाची शस्त्र वापरून फिर्यादीला पूर्णपणे घाबरवण्यात आले. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 316 (2), 318 (4), 351 (2)(3), 61 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) व 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुंगळे हे करत आहेत.

आयुष्यभराची कमाई लक्ष्य ; एफडी, पेन्शन व दागिन्यांवर डल्ला

भीतीच्या या जाळ्यात अडकवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची योजना आखली होती. यात त्यांना पोस्टातील फिक्स्ड डिपॉझिट (FD) मोडण्यास, पेन्शनवर कर्ज घेण्यास, घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएस व चेकद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम ट्रान्सफर करून घेतली गेली. या संपूर्ण प्रक्रियेत आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक लूट करत फिर्यादी दाम्पत्याच्या आयुष्यभराच्या साठवणीवर डल्ला मारला. या प्रकरणात एकूण 97 लाख , 83 हजार इतकी रक्कम लंपास झाल्याचे निष्पन्न झाले, हा प्रकार सेलू परिसरातील आतापर्यंतच्या मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.

सायबर पोलीस व प्रशासनाचा नागरिकांना इशारा

आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल क्रमांकांचा तपास सुरू आहे. सायबर पोलीस व प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला की, डिजिटल अरेस्ट, ईडी/सीबीआय/पोलीस अधिकारी असल्याचे भासवणारे कॉल किंवा व्हिडिओ कॉल हे पूर्णपणे फसवे असतात. अशा कॉल्सना घाबरू नये, कोणतीही आर्थिक व्यवहाराची माहिती शेअर करू नये आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल सुविधा वाढत असताना, दुसरीकडे सायबर गुन्हेगारांनी भीती, भ्रम आणि मानसिक दबाव यांचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करण्याचा धोकादायक पॅटर्न अधिक तीव्र झाला आहे. सेलूतील ही घटना त्याचेच जळजळीत उदाहरण ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news