Distribution of 'Bhandi Sanch' to one and a half lakh beneficiaries by the Labor Board
छत्रपती संभाजीनगर, पुढरी वृत्तसेवा : कामगार मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून पात्र कामगारांना भांडी संचाचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेत अडीच लाख कामगारांनी नोंदणी केली असून, आजपर्यंत १ लाख ५२ हजार लाभार्थीना संचाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि ऑनलाईन प्रक्रियेमधील विलंबामुळे जवळपास निम्मे म्हणजेच सुमारे ८० ते ९० हजार कामगार या लाभापासून वंचित राहिले. अखेर दीड लाख लाभार्थीना मात्र संचाचे वाटप पूर्ण करण्यात आले.
कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अनेक बांधकाम कामगार असून, आजपर्यंत २ लाख ३२ हजार जीवित नोंदणी आहे. जिल्हाभरातील १५ गोडऊनमधून १ लाख ५२ हजार कामगारांना या भांडी संचाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी नव्याने वेबसाईड सुरू करण्यात आली असून, ऐनवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जीवित नोंदणीतील सुमारे ८० हजार लाभार्थीना अद्याप संच वाटप झालेले नसल्याची माहिती कामगार उपायुक्त बोरसे यांनी दिली. तसेच वर्षभरात ९० दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांना केवळ शासकीय फीस भरून या योजनेत ऑनलाईन पध्द-तीने नोंदणी करता येते.
त्यासाठी शासनाचे प्राधिकृत अधिकारी किंवा नोंदणीकृत ठेकेदाराकडून ही नोंदणी करता येते. मात्र ऑनलाईनचे ज्ञान नसल्याने काही कामगार खासगी सेंटरचालक दोन हजार रुपये घेत आहेत. यासंबंधीच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचेही बोरसे यांनी सांगितले. या योजनेत लाभार्थ्यांना दिला जाणारा संच हा दैनंदिन गरजेनुसार उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीचा आहे.
यामध्ये प्रामुख्याने भांडी, ताटली, डबे, तसेच स्वयंपाकघरातील इतर साहित्याचा समावेश आहे. मात्र नोंदणी करूनही लाभ मिळू न शकलेल्या कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करूनही आमच्या नावावर लाभ दाखल झाला नाही. तांत्रिक अडचणींचा बोजा आम्ही का सहन करायचा? असा सवाल अनेक लाभार्थीकडून उपस्थित केला जात असून, संच मिळवण्यासाठी रोजदांरी बुडवावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचेही लाभार्थीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करणे, संगणकीय प्रणाली अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक लाभार्थीला वेळेत योजनाचा लाभ मिळेल यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
या योजनेतील भांडी संचाचे वाटप करण्यात येत असलेल्या केंद्रावर लाभार्थीची आर्थिक पिळवणूक सुरू असून, दोन हजार रुपये दिले तरच भांडी संच दिला जात आहे. हे पैसे न दिल्यास तांत्रिक अडचणीचे कारण दिले जाते. नंबर लावूनही संच न मिळाल्यास पुन्हा नोंदणी करावी लागते. त्यासाठी येणारा खर्च आणि संच घेण्यासाठी मारावी लागणारी सुटी यामुळे दुहेरी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे काही लाभार्थीकडून सांगण्यात आले.