

Pieces of cement concrete were placed on the railway track.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे रुळावर सिमेंट काँक्रीटचे तुकडे ठेवून अज्ञाताने रेल्वे अपघात घडविण्याचा प्रयत्न केला. या सिमेंटच्या तुकड्यावरून नंदीग्राम एक्स्प्रेस आणि एक मालवाहू रेल्वे गेल्याने दोन्हीच्या इंजिन कॅटलचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि.९) रात्री १२:३५ ते १२:५८ या वेळेत चिकलठाणा शिवारातील केंब्रिज चौकाच्या पुढे पोल क्र. १२६/६ व १२६/७ आणि पोल क्र. १२७/१ व १२७/२ च्यादरम्यान रेल्वे रुळावर घडली. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.
करमाड येथील रेल्वे पथचे कनिष्ठ अभियंता अनुजकुमार सोरनसिंह (२९) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे रेल्वे लाईन दुरुस्ती व देखरेखची जबाबदारी आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगही करतात. मंगळवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांना नांदेड रेल्वे कंट्रोलचा कॉल आला. चिकलठाणा शिवारात केंब्रिजच्या बाजूला उड्ड ाणपुलाखाली रेल्वे रुळावर अज्ञाताने सिमेंट काँक्रीटचे तुकडे ठेवले असून, रेल्वे रुळावरून उतरून अपघात घडवण्याच्या उद्देशाने केले आहे.
त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस ही संभाजीनगरवरून जालन्याकडे जात असताना रेल्वे चालकाला रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार दिसला. सिमेंटच्या तुकड्याना रेल्वे इंजिनची कॅटल गार्डला टक्कर होऊन नुकसान झाले आहे. त्यानंतर आणखी एक मालगाडी जालन्याकडे जाताना काही अंतरावर हाच प्रकार घडला. त्यानंतर नंदीग्रामचा लोको पायलटने जालना स्टेशन मास्तरला माहिती दिली. मालगाडीच्या लोको पायलटने करमाडला कळविले होते. त्यानंतर कंट्रोलवरून अनुजकुमार यांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच अनुजकुमार हे कर्मचारी झिरवालसोबत घटनास्थळी धावले. तिथे रात्रगस्तीवरील कर्मचारी जाधव व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक भास्करराव, उपनिरीक्षक चंदूलाल, जमादार खान आलेले होते. दोन्ही ठिकाणी सिमेंटचे तुकडे रेल्वेला धडकून चुराडा झाल्याचे दिसून आले. रेल्वे पटरीवरून घसरून अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका व्हावा यासाठी हे कृत्य केल्याचे दिसून आले. त्यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पीए-सआय विष्णू मुंडे करत आहेत.