

GST cut boosts vehicle market ahead of Dussehra-Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने जीएसटी कपात केल्याने यंदा दिवाळीपूर्वी वाहन बाजारात धूम सुरू आहे. नवीन जीएसटी स्लॅबनूसार वाहन खरेदीदारांना दुचाकीमध्ये ८ ते १५ हजार तर चारचाकीमध्ये ५० हजार ते १.५ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. या संधीचे सोने करण्यासाठी २५ टक्के बुकींग आताच झाली असून, सणासुदीत वाहन बाज-ारात अधिक गर्दी होऊन यावर्षी उलाढालही ३० टक्यांनी वाढण्याची आशा आहे.
दरवर्षी दसरा-दिवाळी पाडव्याला वाहन बाजारात खरेदीची धूम सुरू होते. या शुभमुहूर्तावर वाहन घरी नेण्यासाठी वाहन खरेदीदारांची विविध शोरुमवर गर्दी होत असते. यंदा मात्र, जीएसटीचा नवीन स्लॅब जाहीर करुन केंद्राने ग्राहकांना दिवाळी भेटच दिली आहे. वाहनांवरील २८ टक्के जीएसटी कमी करुन १८ टक्के केला आहे. यामुळे वाहनांची किंमत १० टक्यांनी कमी होणार आहे. जीएसटीचे हे नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील. मात्र, तत्पूर्वीच वाहन बाजारात सणासुदीस-ारखी धूम सुरु आहे. निर्णयाची घोषणा होताच विविध कार उत्पादन कंपन्यांनीही किंमती कमी करण्याचे नियोजन सुरु केले आहे. यानूसार वाहन शोरुमवर वाहन खरेदीदारांची गर्दी होत आहे.
वाहनांवरील २८ टक्के जीएसटी आता १८ टक्केपर्यंत कमी झाला आहे. त्याचा थेट फायदा वाहन खरेदीदारांना होईल. लाख रुपयांच्या दुचाकीवर ८ हजार तर त्याहून अधिक किंमतीच्या दुचाकीवर १० ते १५ हजार रुपये कमी होतील. २५ ते ३० लाखापर्यंतच्या चारचाकीवर सरासरी दहा टक्के म्हणजे १ ते २ लाख रुपये कमी होऊ शकतील. १५ लाखाच्या ट्रॅक्टरवर दीड लाख रुपये कमी होतील. अधिक स्पष्टता २२ तारखेनंतरच होईल. असेही वितरकांनी सांगितले.