छत्रपती संभाजीनगर : मुंबई क्राईम ब्रँच आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चे अधिकारी असल्याचे भासवून एका ५३ वर्षीय गृहिणीला डिजिटल अरेस्टची भीती घालत सुमारे २५ लाख ८७ हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता फिर्यादी महिला (काल्पनिक नाव, रा. गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती बिजनेस कन्सलटंट असून, त्या गृहिणी आहेत. १६ डिसेंबर रोजी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला. भामट्याने त्यांचा मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगून, त्यांच्या नावे छळवणूक आणि बेकायदेशीर जाहिरातींशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांचा कॉल मुंबई क्राईम ब्रँचच्या कथित अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला.
आरोपींनी व्हॉट्स ॲपवर व्हिडिओ कॉल केला, ज्याच्या प्रोफाईलला मुंबई पोलिसांचा लोगो होता. मनी लाँडरिंगच्या खोट्या प्रकरणात नाव आल्याचे सांगून त्यांना अटक वॉरंट पाठवण्यात आले आणि डिजिटल अरेस्ट करून घराबाहेर न जाण्याची तंबी दिली. त्यामुळे सुनीता प्रचंड घाबरल्या. मुंबईच्या ईडी कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. त्यांना एक कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड दाखवले ज्यावर त्यांचे नाव होते. एका आरोपीचा फोटो दाखवून त्याने तुमचे नाव घेतले आहे. माझा काही संबंध नाही, असे नोटबुकवर लिहायला सांगून सही करायला लावली.
घरावर धाड मारून गोळीबाराची धमकी
कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याची आणि घरावर धाड टाकून गोळीबार करण्याची धमकी देऊन त्यांना कोणालाही काहीही सांगण्यापासून रोखले. तपासाच्या नावाखाली आरोपींनी तक्रारदाराला त्यांच्या बँक ऑफ बडोदा आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेतील मुदत ठेवी तोडण्यास भाग पाडले. १६ ते २२ डिसेंबरदरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २५.८७ लाख रुपये वर्ग करून घेतले.
पतीच्या सर्तकतेमुळे प्रकार उघड
तक्रारदार महिला प्रचंड तणावात असल्याने त्यांच्या पतीने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि. २५) पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास निरीक्षक भंडारे करत आहेत.
व्हिडिओ कॉल सुरूच ठेवला
भामट्याने त्यांना व्हिडिओ कॉल सर्व्हिलन्सवर असल्याची बतावणी करून त्यांना कॉल सुरूच ठेवण्यास सांगितले. त्यामुळे सुनीता यांनी मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला. १७ डिसेंबरला सकाळी पुन्हा भामट्याने आरोपीने तुम्हाला ओळखले असून, तुम्हाला १० टक्के कमिशन दिल्याचे सांगतो आहे. तुमच्याविरुद्व तीन पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक करत असल्याचे सांगून तुमच्या घरी ईडीचे अधिकारी येतील, अशी धमकी दिली. गुगल पेवरून ४६ आणि ५४ हजार भामट्याने मागवून घेतले.