Sambhajinagar News : दिव्यांग आंदोलकांची महापालिका गेटवर धडक file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दिव्यांग आंदोलकांची महापालिका गेटवर धडक

आयुक्तांच्या भेटीवर ठाम : सुरक्षारक्षकांशी रेटारेटी, अन्य प्रवेशद्वारेही करावी लागली बंद

पुढारी वृत्तसेवा

Differently-abled protesters storm the municipal corporation gate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिव्यांगांकडून सलग दोन दिवसांपासून महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू असून दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.९) दिव्यांग आंदोलकांनी अचानक आक्रमक वळण घेतले. आयुक्त अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय माघार न घेण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले. त्यानंतर मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी त्यांनी मुख्य प्रवेशद्वार गाठून गेट ढकलण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी आतून ३० ते ४० सुरक्षारक्षकांनी गेट पकडून ठेवले. या झटापटीत काही सुरक्षारक्षकांच्या हातांना किरकोळ ओरखडे लागले.

महापालिका मुख्यालयासमोर सलग दोन दिवसांपासून दिव्यांगांकडून ठिय्या देत आंदोलन सुरू आहे. पहिल्या दिवशी तुलनेने शांत असलेल्या आंदोलनाने बुधवारी वेगळेच स्वरूप धारण केले. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी करीत थेट मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षाव्यवस्था वाढविली. यासह मुख्य गेटवर अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

तसेच आंदोलकांचा जमाव गेटबाहेरून जोर लावत असताना सुरक्षारक्षकांनी आतून प्रवेशद्वार रोखून धरले. काही काळ दोन्ही बाजूंनी जोर लावला गेल्याने मुख्य गेटवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांची भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिस्थिती अधिक चिघळू नये आणि मुख्यालयाच्या आवारात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेची इतर प्रवेशद्वारेही बंद केली. त्यामुळे मुख्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली.

नागरिकांची गैरसोय

महापालिकेच्या विविध विभागांत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाढविण्यात आलेल्या सुरक्षाव्यवस्थेमुळे प्रवेश करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. आंदोलन आणि सुरक्षाव्यवस्था यामुळे मुख्यालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र प्रशासकीय कामकाज विस्कळीत होऊ नये, यासाठी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत आंदोलकांशी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

गेटवर सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त

दिव्यांग आंदोलकांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारावर ३० ते ४० सुरक्षारक्षकांची फळी उभी करण्यात आली. आंदोलकांकडून गेटवर दबाव वाढताच सुरक्षारक्षकांनी ते आतून घट्ट धरून ठेवले. या रेटारेटीत सुरक्षारक्षक जखमी झाले नसले तरी काहींच्या हातांना ओरखडे लागले. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व प्रवेशमार्गावर विशेष लक्ष केंद्रित करून उदकवाहन (लिफ्ट) ही काही वेळासाठी बंद ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT