Devendra Fadnavis: Postponing elections is very wrong.
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे असून, अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल. असे आजपर्यंत कधीच झाले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री दैवेद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाविरोधात नाराजी जाहीर केली. या निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष राहील. खालोखाल दोन्ही मित्र पक्ष राहतील. तसेच महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून ७० ते ७५ टक्के जागांवर विजयी होण्याचा त्या दावाही त्यांनी सोमवारी केला.
सोमवारी पत्रकारांशी येथे बोलताना फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कोणाचा सल्ला घेत आहे, याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला, त्यावर माझा अभ्यास असून वकिलांसोबतही चर्चा केली आहे. त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले, तर निवडणुका रद्द होत नाहीत. निलंग्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.
ज्याचे नामनिर्देशनपत्र रद्द झाले, तो न्यायालयात गेला म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाला मत कळवले. निवडणूक आयोग स्वायत्त असून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. तो निर्णय मान्य करावा लागेल. तथापि निवडणुकीसाठी ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या, त्यांनी घेतलेली मेहनत आणि कष्ट निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वाया गेले, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
शिंदेची भेट न झाल्याने चर्चांना उधाण
प्रचारानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी होते. मात्र त्या दोघांत भेटच झाली नसल्याची चर्चा होती. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, आमच्या दोघांत भेट झाली नाही. कारण रात्री मी उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो आहे.