

Heavy vehicles disrupt traffic on Chittegaon-Bidkin road
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतीक्षित छत्रपती सभांजीनगर ते पैठण मुख्य मार्गातील मधला टप्पा चित्तेगाव-बिडकीन रस्त्यावरील सुरू असलेल्या चारपदरी रस्त्याच्या कामामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून, दररोज दोन ते तीन तास वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
चित्तेगावमधील व्हिडिओकॉन गेट क्र. ०१ ते जिल्हा परिषद शाळा आणि बिडकीन मधील साई मंदिर ते नवीन टोल नाकादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
प्रभावी योजना वा नियोजन प्रत्यक्ष अमलात पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्र काढून २६ नोव्हेंबर २०२५ पासून ११ डिसेंबर २०२५ पर्यंत जड वाहनांना मूळ मार्गावरून पूर्णताः वाहतुकीस निर्बंध लादले आहेत, मात्र पोलिसांनी फक्त कागदी घोडे नाचवले असून, कोणतीही आणले नाही. यामुळे जड वाहतूक सुरूच असून, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने व ठेकेदांराचे वाहन सामग्री रस्त्यावर असल्याने बिडकीन ते चितेगावपर्यंत रोज वाहतूक कोंडी होत आहे. याचा नाहक त्रास वाहनधाकांना होत आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी गरजेची
पर्यायी मार्गाची अंमलबजावणी करणारी यत्रंणा अपुरी पडली असून, काखेत कळसा, गावाला वळसा यासारखी अवस्था असल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. नागरिक, दुचाकीस्वार, विद्यार्थी आणि कर्मचारी दीर्घ कोंडीत अडकत आहेत, या परिसराला आधीच अपघातप्रवण म्हणून ओळख असून, रस्ता खोदकाम, जड वाहनांची वाहतूक आणि अरुंद मार्गा मुळे अपघातांची शक्यता आणखी वाढल्याचे पोलिसांनीही मान्य केले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत वाहन धारकांनी व्यक्त केले आहे.