Chhatrapati Sambhajinagar News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : देवळाणा येथे तरुण शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

मुलगी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पंढरपूरला

पुढारी वृत्तसेवा

देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे संतोष रंगनाथ काळवणे (वय ३८) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याचा मृतदेह शुक्रवारी (दि. १६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीजवळ आढळून आला. दरम्यान, त्यांची मुलगी दिव्या काळवणे ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आईसोबत पंढरपूर येथे गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली.

संतोष काळवणे हे देवळाणा येथे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. अल्पभूधारक शेतकरी असलेले संतोष हे शेतीसोबतच रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. यंदा पावसाने दडी मारल्याने शेतीच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यातच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास देवळाणा येथील स्मशानभूमीसमोरील रस्त्याच्या बाजूला संतोष काळवणे हे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले काही तरुणांना दिसले. त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू होती. रात्री झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, संतोष काळवणे यांची मुलगी दिव्या संतोष काळवणे ही देवगाव रंगारी येथील कन्या प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. ती कुस्तीपटू असून, नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत तिने यशस्वी कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.

शुक्रवारी दिव्या ही राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आईसोबत पंढरपूर येथे गेली होती, तर तिचा लहान भाऊ घरी होता. मुलीने कुस्ती क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा आनंद कुटुंबासोबत साजरा करण्याची वेळ असतानाच वडिलांच्या निधनाची दुर्दैवी घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT