Delayed birth and death registration scam exposed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या विशेष तपास मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विलंबित प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहाराचा मोठा जन्म-मृत्यू भंडाफोड झाला आहे. छाननीदरम्यान २,१७३ प्रमाणपत्रे तातडीने रद्द करण्यात आली असून ४७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घडामोडींनी प्रशासनाला हादरवून सोडले असून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांवरील कडक शिस्तीचा इशारा यातून देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या १ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार, केवळ आधार कार्डावर आधारित विलंबित जन्म किंवा मृत्यू नोंदी देणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पुराव्यांशिवाय प्रमाणपत्रे जारी झाल्याचे निष्पन्न झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अहवालानुसार ७२१४ प्रकरणांपैकी २१७३ रद्द करण्यात आली असून ५०४१ प्रकरणांची पडताळणी सुरू आहे. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १३९ प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, तसेच मनपा व शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या मोहिमेमुळे जिल्ह्यातील बनावट प्रमाणपत्रांच्या साखळीवर मोठा आळा बसणार असून भविष्यातील अशा गैरप्रकारांना कठोर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तफावत आढळल्यास तत्काळ एफआयआर
याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, आधार व जन्मतारख्यात तफावत आढळल्यास तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बेकायदा प्रमाणपत्रे घेतलेल्या नागरिकांनी ती स्वतःहून निबंधक कार्यालयात परत करावीत, अन्यथा कारवाई टाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.