Jewellery Theft : घरातून सुनेनेच लांबवले ३२ लाखांचे दागिने file photo
छत्रपती संभाजीनगर

Jewellery Theft : घरातून सुनेनेच लांबवले ३२ लाखांचे दागिने

जवाहरनगर पोलिस ठाण्यात सुनेसह तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Daughter-in-law herself steals jewellery worth ₹32 lakh from the house

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या भावाच्या मदतीने सुनेने घरातून तब्बल ३२ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे, डायमंडचे दागिने आणि रोकड घेऊन गेली. सासऱ्यांनी वारंवार विचारणा करूनही सुनेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शनिवारी (दि. २६) जवाहरनगर पोलिस ठाण्यात सून आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघा सौरभ तिबडीवाला (३१), तिचा भाऊ आदित्य सतीश गर्ग (२८, रा. सुरत, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी चेतनानगर, काल्डा कॉर्नर येथे राहणारे व्यावसायिक संजय ताराकुमार टिबडीवाला (६३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची सून मेघा सासरी नांदत असताना २५ मे २०२६ च्या सुमारास तिचा लहान भाऊ आदित्य हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता.

यावेळी माहेरी जाताना मेघा आणि तिचा भाऊ आदित्य यांनी सासरे संजय यांनी एका बॅगेत ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने आणि रोकडही घेऊन गेले. ५ जुलै २०२६ पर्यंत हा प्रकार घडला. घेऊन गेलेल्या मुद्देमालात १.२५ लाखांचा डायमंड हार, ६ तोळ्याचा १४ लाखांचा सोन्याचा हार सेट, ३.३ तोळ्याचा साडेपाच लाखांचा सोन्याचा नेकलेस, ३ तोळ्याची ५ लाखांची सोन्याची बोरमाळ, ३ तोळ्याच्या ४.२५ लाखांच्या डायमंड बांगड्या, १ लाखाचे सोन्याचे बालाजीचे लॉकेट, चांदीची नाणी, ४ ग्रॅमचे ६० हजारांचे सोन्याचे नाणे आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ३२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज आहे.

ही कौटुंबिक बाब असल्याने सासरे संजय टिबडीवाला यांनी सुरुवातीला सुनेशी संपर्क साधून दागिन्यांबाबत विचारणा केली. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वाघ हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT