कारांची फिल्मीस्टाईल धोकादायक स्टंटबाजी file photo
छत्रपती संभाजीनगर

Car Stunt : कारची फिल्मीस्टाईल धोकादायक स्टंटबाजी

सिल्लोड : सराफा मार्केटमधील घटना, चार कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

Dangerous, film-style stunt driving with a car

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसानिमित्त शहरात फिल्मीस्टाईल एकामागून एक चार कारची धोकादायक स्टंटबाजी करणे पाच तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. शहरातील वर्दळ असलेल्या सराफा मार्केटमध्ये कारांची धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार कार जप्त करण्यात आल्या आहे. तर ही घटना मंगळवारी (दि. १०) रात्री आठच्या सुमारास घडली.

अन्सार ऊर्फ अज्जु शहा जलाल शहा (रा. एकतानगर, सिल्लोड), योगेश सुभाष सोनवणे, अक्षय राजू खंडागळे (दोघे रा. टिळकनगर, सिल्लोड), राहुल मिलिंद सूर्यवंशी, स्वामी साहेबराव पवार (दोघे रा. जयभवानीनगर, सिल्लोड) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हल्ली वाढदिवसानिमित्त तसेच रील बनवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही. असाच हा प्रकार समोर आला आहे. वाढदिवसानिमित्त वरील पाच तरुणांनी एकामागून एक फिल्मीस्टाईल चार कारांची वेडीवाकडी वळणे घेत धोकादायक स्टंटबाजी केली. विशेष म्हणजे ही स्टंटबाजी शहरातील अतिशय वर्दळ असलेल्या सराफा मार्केटमध्ये करण्यात आली.

माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत चार कार जप्त केल्या. तर स्टंटबाजी करणाऱ्या वरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तर अन्सार उर्फ अञ्जु शहा जलाल शहा याच्या वाढदिवसानिमित्त कारांची स्टंटबाजी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायकपणे वाहन चालवू नये. नियमांचे पालन करावे. स्टंटबाजी किंवा नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होईल, असे वाहन चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिला आहे.

सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सराफा मार्केट शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. दिवाळी पाडवा असल्याने मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. अचानक एकामागून एक धूमस्टाईल चार कार आल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने ही माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी धाव घेत कार जप्त केल्या व तरुणांवर गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT