Sambhajinagar News : वर्षभर टँकरचा प्रस्ताव, नव्या पाणी योजनेचा जल्लोष कशासाठी?

भाजपच्या फुगडीवर एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्यांचा सवाल
Sambhajinagar News
Sambhajinagar News : वर्षभर टँकरचा प्रस्ताव, नव्या पाणी योजनेचा जल्लोष कशासाठी?file photo
Published on: 
Updated on: 

Why the fanfare over a new water scheme when tankers are required all year round?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या पाणीपुरवठा योजनचे पाणी शहरात दाखल झाल्याचा जल्लोष करत भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले, फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, दुसरीकडे महापालिका प्रशासनाने शहरातील नो नेटवर्क वसाहतींसाठी पुढील वर्षभर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.

Sambhajinagar News
Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षणात शहराच्या निकालाची उत्सुकता

नव्या योजनेचे पाणी आले असेल, तर वर्षभर टँकरची गरज का? भाजपने मग फुगडी कोणत्या आनंदात खेळली, असा सवाल शुक्रवारी (दि. १२) एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना बिल्डर यांनी प्रशासनाच्या टँकर प्रस्तावातील तरतुदींकडे लक्ष वेधले.

महापालिकेकडून सध्या शहरी भागातील सुमारे २०० नो नेटवर्क वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सिडको एन-५, एन-७, कोटला जलकुंभ आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या चार केंद्रांवरून टँकरमध्ये पाणी भरून ते संबंधित भागांत पोहोचविले जाते. सध्याच्या कंत्राटदाराने ९ जून २०२६ पर्यंत केलेल्या पाणीपुरवठ्यापोटी २ कोटी १० लाख रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मुलांच्या भांडणातून राडा ! घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोन स्कुटी पेटवल्या

तसेच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी आणखी १ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे या टप्प्यातील एकूण चार कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. दरम्यान, नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे कारण देत प्रशासनाने पुढील वर्षभरासाठी टँकर पुरवठ्याचे स्वतंत्र नियोजन केले आहे.

त्यासाठी ५.०१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शहर आणि सातारा-देवळाई परिसरासाठी ६६ टँकर भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी शहरात चार हजार लिटर क्षमतेचे ५१ आणि दहा हजार लिटर क्षमतेचे सहा, असे ५७ टँकर ठेवण्यात येणार आहेत. तर सातारा-देवळाईसाठी चार हजार लिटर क्षमतेचे चार, १२ हजार लिटर क्षमतेचे दोन आणि २४ हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर घेण्याचे नियोजन आहे.

या व्यवस्थेसाठी प्रशासनाने ५ कोटी ३९ हजार २७४ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मात्र नव्या योजनेच्या पाणीपुरवठ्याचा जल्लोष सुरू असतानाच प्रशासनाच्या या प्रस्तावामुळे योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे विरोधी पक्षनेता समीर साजीद बिल्डर यांनी म्हटले आहे.

आमखास मैदानावर उभे करा ६६ टँकर

टँकर पुरवठ्यासाठी निविदा भरणारे आणि प्रत्यक्ष टँकर उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी यांचा परस्परांशी नेमका काय संबंध आहे, असा सवाल समीर बिल्डर यांनी उपस्थित केला. महापालिकेला पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व ६६ टँकर आधी आमखास मैदानावर रांगेत उभे करा आणि त्यानंतरच हा विषय मंजूर करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच टँकरसाठी आरटीओची ना-हरकत प्रमाणपत्रे आणि फिटनेस प्रमाणपत्रे यांची उपलब्धता व वैधता यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे टँकरचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष वाहनांची उपलब्धता आणि आवश्यक कागदपत्रांबाबत सभागृहात स्पष्टता द्यावी, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

तर टँकर बंद करण्यात येतील 66 नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी टप्प्याटप्प्याने नो-नेटवर्क भागात दिले जाणार असून, त्यानुसार कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, प्रत्यक्ष नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत टँकरची पर्यायी व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. ज्या भागात नळाद्वारे पाणी उपलब्ध होईल, त्या भागातील टँकर बंद करण्यात येतील.
- समीर राजूरकर, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.