Ajanta Caves : अजिंठा लेणीवर पर्यटकांचा महापूर; एसटीच्या अपुऱ्या नियोजनाचा फटका !

तीन दिवसांत तब्बल २६ हजार पर्यटकांची भेट; तिकिटांसाठी लांबच लांब रांगा
Ajanta Caves
Ajanta Caves : अजिंठा लेणीवर पर्यटकांचा महापूर; एसटीच्या अपुऱ्या नियोजनाचा फटका !file photo
Published on: 
Updated on: 

Flood of tourists at Ajanta Caves; The impact of inadequate planning of ST!

सागर भुजबळ

फर्दापूर : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांचे औचित्य साधत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल २६ हजार पर्यटकांनी ऐतिहासिक अजिंठा लेणीला भेट देत येथील प्राचीन शिल्पकला, अप्रतिम कलाकुसर आणि भित्तिचित्रांचा आनंद लुटला. मात्र, पर्यटकांच्या या वाढत्या लोंढ्याच्या तुलनेत एसटी महामंडळाचे नियोजन तोकडे पडल्याने मंगळवारी पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सुरुवातीला केवळ सहा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याने तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्या. तासन्तास प्रतीक्षा करूनही बस मिळत नसल्याने पर्यटक आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या घटना घडल्या.

Ajanta Caves
Loan waiver : कर्जमाफी रखडली, बँकांकडून वसुलीचा तगादा

दिवाळीच्या सुट्टयांमुळे देशाच्या विविध भागांतून तसेच विदेशातून पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी दाखल होत आहेत. मंगळवारी सकाळपासूनच पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत असताना सोयगाव आगाराकडून सुरुवातीला केवळ सहा बसेस पाठविण्यात आल्या. त्यामुळे लेणीपर्यंत जाण्यासाठी पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. बसच्या तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाचा तडाखा सहन करत लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह परदेशी पर्यटकांनाही तासन्तास रांगेत उभे राहावे लागले.

पर्यटकांची गर्दी वाढत असतानाही बसफेऱ्यांमध्ये अपेक्षित वाढ होत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. तासन्तास रांगेत उभे राहनही तिकीट मिळत नसल्याने पर्यटकांचा संयम सुटला. यावेळी एसटी कर्मचारी आणि पर्यटकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिस कर्मचारी भरत कोळी आणि एमटीडीसीचे व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

Ajanta Caves
Sambhajinagar Drought : दोन लाख ९६ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

दरम्यान, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दुपारनंतर सोयगाव आगाराकडून आणखी पाच बसेस पाठविण्यात आल्या मात्र अतिरिक्त वाहक उपलब्ध नसल्याने बससेवेवरील ताण कायम राहिला. परिणामी, सायंकाळपर्यंत पर्यटकांना तिकीट मिळविण्यासाठी तसेच बसमध्ये जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दिवसभर झालेल्या या गैरसोयीमुळे पर्यटकांनी एसटी महामंडळाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्याच्या उद्देशाने मोठ्या अपेक्षेने आलेल्या अनेक पर्यटकांचा वेळ बसच्या प्रतीक्षेतच खर्ची पडला. वेळेअभावी काही पर्यटकांना अजिंठा लेणीचे दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. जागतिक कीर्तीचा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे लेणी पाहण्यापासून वंचित राहावे लागल्याने पर्यटन व्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अपुऱ्या बसची समस्या नेहमीचीच !

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला दिवाळी, नाताळ आणि उन्हाळी सुट्टयांच्या काळात देश-विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. गर्दीच्या हंगामात पर्यटकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेस, वाहक आणि कर्मचाऱ्यांची पूर्वनियोजनातून व्यवस्था करणे अपेक्षित आहे. मात्र, ऐन गर्दीच्या हंगामात अपुऱ्या बसफेऱ्या आणि वाहकांच्या कमतरतेमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.