Daily wage laborers campaign in elections; Unable to find laborers for agricultural work
सुनील मरकड
खुलताबाद : निवडणूक कोणतिही असो आताच्या काळात कार्यकर्ते गोळा करणे सगळ्याच पक्षांसाठी अतिशय कठीण काम झाले आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज आवश्यक असते. त्यासाठी शेतावर बांधांवर रोजंदारीने काम करणाऱ्यांची मदत घेतली जात असल्याने सध्या शेतशिवारात कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीची धामधूम तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहे. मात्र, याचा परिणाम ग्रामीण भागात पण दिसून येत आहे. निवडणुकीच्या प्रचारास आता रंग भरला जाऊ लागला आहे. उमेदवार प्रचारासाठी फिरू लागले असून जाहीर सभांमधून प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. सभांसाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी उमेदवाराच्या मागे कार्यकर्त्यांची फौज दाखवणे गरजेचे ठरले आहे.
तसेच सभांसाठी श्रोत्यांची गर्दी जमवणेही कठीण होत आहे. अशा काळात चार पैसे कमावण्याची संधी रोजंदारीवर शिवरात काम करीत असलेल्यांना उपलब्ध झाली आहे. त्यांच्याकडूनही या 'साईड बिजनेस'ला प्राधान्य दिले जात आहे. एक दिवसभर उमेदवाराच्या मागे फिरण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये मिळत आहेत. तसेच दुपारचे जेवण आणि घरापर्यंत पोचविण्याचीही सोय काही उमेदवार करून देत आहेत. कोणतीही अंगमेहनतीचे काम न करता उमेदवाराच्या मागे राजकीय पक्षाचा फिरणे, सभेला उपस्थित राहणे या कामासाठी आता पैसे मिळू लागल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामाला मजूर मिळणे कठीण होऊ लागले आहे.
मध्यंतरी झालेल्या गारपीट, वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताशी आलेले उरले सुरलेले पिक घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची गरज आहे. मात्र आता शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतात जे काय पिक आहे ते घरी कसे आणायचे याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे. तसेच शेतात काम करण्यासाठी मजूर आणायचे कोठून याची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.