

Sambhajinagar political election Promotion
सुनील मरकड :
खुलताबाद : वीस पंचवीस वर्षांपूर्वी निवडणूक काळात पथारीवरील दिवे, कंदिलाची उजळण, गूळ-शेंगदाण्याच्या पुड्या आणि त्यात लोकशाहीचा गोडवा हे सगळे गावाच्या संस्कृतीचे अंग होते.
जुन्या पिढीतील नागरिक सांगतात की, कधी काळी उमेदवार ओल्या गवताच्या सुगंधात, खांद्यावर पक्षाची हाताने पेंटिंग केलेली पाटी घेऊन दारोदार फिरायचे. कुठे पत्रकांचे दुकान नव्हते... ना हॉटेल... ना पार्टी...ना सोशल मीडिया... एका गल्लीत दोन सभा आणि त्यातही गावातील ज्येष्ठ मंडळींची परिसराच्या विकाससाठी निकोप वादविवादमुळे सभा लक्षवेधी ठरायच्या.
मंदिराच्या पारावरच्या चर्चा, चौकातील रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या राजकीय गप्पांत उमेदवारांच्या गुण-दोषांची होणारी समीक्षा ज्येष्ठ नागरिकांना आजही आठवते. दरम्यान, आता मात्र प्रचाराचा गडगडाट, ध्वनिक्षेपकांचा कलकलाट आणि भव्य रॅलीचा थाट हे मागील काही वर्षांत चित्र तयार झाले.
मोबाईल, सोशल मीडिया आणि प्रचंड प्रचाराच्या गोंगाटात आज त्या पारावरील निवडणुकीच्या चर्चा आठवणींतच उरल्या आहेत. गावपातळीवरील ही साधी, पण लोकशाहीची खरी शाळा असलेली परंपरा हळूहळू नामशेष होत चालल्याची खंत ज्येष्ठांकडून व्यक्त केली जाते.
प्रचारापलीकडच्या जुन्या आठवणींचा प्रवास
आजच्या सोशल मीडियाच्या, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या राजकारणापूर्वी एक काळ असा होता, जेव्हा निवडणुकीच्या चर्चा मंदिराच्या पारावर गूळ-शेंगदाणे खात रंगत असत. गावातील ज्येष्ठ, तरुण, शेतकरी, व्यापारी सगळेच संध्याकाळच्या थंडाव्यात मंदिराच्या पारावर बसून उमेदवारांवर सखोल चर्चा करायचे. कोणाचा विकासाचा मुद्दा पुढे? कोण जनतेत मिसळतो? कोण काम करतो? अशा गप्पांचा धुरळा उडायचा.