

200 MLD water will be available only after the municipal elections.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार जीव्हीप आर कंपनीला दिले.
परंतु, अंतिम टप्प्यात ३७०० अश्वशक्तीचे पंप आणि तेवढ्याच क्षमतेच्या मोटार बसविण्यासह मेनीफोल्ड पाईप जोडणी, जायकवाडी धरणातील जॅकवेललगतचे कॉफरडॅम काढणे, सायफन पद्धतीने पाणी उवसा करणे, जलवाहिन्या धुणे यासह इतर तांत्रिक, सुक्ष्म व किचकट कामासाठीच किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कामात थोडीही घाई केल्यास संपूर्ण योजनाच संकटात येण्याची दाट शक्यता आहे.
शेवटच्या टप्प्यातील काम हे पाण्याचे प्रेशर सहन करण्यासह त्याला नियंत्रणात ठेवण्याचे आहे. त्यामुळेच हे काम बारकाईचे असल्याने मोठा अवधी लागेल, असेच मायक्रॉन आणि मिलीमीटरमध्ये प्रत्यक्षात काम करणाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ऐकवसाय मिळाले आहे. यामुळे महापालिका निवडणुकीनंतरच शहराला नव्या योजनेतून २०० एमएलडी पाणी मिळेल, असे चित्र युद्ध पातळीवर सुरू असलेल्या कामावरून दिसत आहे.
जलवाहिनी ... स्वच्छतेसाठी
शहराला २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही जलवाहिनी ३८ किलो मीटर लांबीची असून ती दोन वेळा स्वच्छ धुण्यासाठीच किमान सहा आठवडे लागणार आहेत. तेव्हा दीड महिना यात जाणार असून त्याचवेळी इतर कामेही सुरूच राहील.
शिल्लक तांत्रिक व किचकट कामे
नक्षत्रवाडी ते जायकवाडी मुख्य जलवाहिनीवरील ८ गॅप एकमेकांशी जोडणे.
▶ जायकवाडी धरणातील जॅकवेल ते जुना पंपगृह अर्धा किलोमीटर जलवाहिनी जोडणे.
▶ जॅकवेलवर मोटारला विद्युत पुरवठा करणे. त्यासाठी ३५ किलोमीटर लांबीचे केबल टाकणे.
» सहापैकी एकच पंप व मोटार बसली असून आणखी पाच पंपासह मोटारचे काम शिल्लक.
▶▶ पंपातून निघणारे पाणी मुख्य जलवाहिनीपर्यंत पोहचविण्यासाठी मेनीफोर्ड पाईप जोडणे. काँक्रिटीकरण करणे.
▶ धरणातून जॅकवेलपर्यंत ३०० मि.मी. व्यासाचे पाईप टाकून सायफन पद्धतीने पाणी आणणे.
▶ ३८ किलो मीटर लांबीची व २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी दोन वेळा स्वच्छ धूणे.
▶ नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून उंच पाणी जलकुंभापर्यंत पाहणी पोहचविण्यासाठी विद्युतीकरण.
▶ १००० किलो मीटरच्या अंतर्गत जलवाहिन्या स्वच्छ धुणे.