Currently, only encroachment removal campaign is going on in the city, service road will not be built, says Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्याच्या जागेत अनेकांनी विनापरवानगी बेकायदा बांधकामे केली आहेत. ही बांधकामेच सध्या मार्किंग करून पाडण्यात येत आहेत. तूर्तास सर्व्हिस रोडचे काम करणार नसल्याने मंजूर ६० मीटर रुंदीच्या रस्त्यावर पुन्हा बांधकामे होऊ नये यासाठी खांब रोवण्यात येईल. तर रस्ते तयार करण्यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल, अशी स्पष्ट भूमिका मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी पडेगाव रस्त्यावरील पाडापाडीची पाहणी करताना (दि. ४) मांडली.
शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या जागेवर मनपाची परवानगी न घेता बांधकामे केली आहेत. यातील बहुतांश बांधकामे ही अगोदर ग्रीन झोनमध्ये होती. परंतु आता नव्या आराखड्यानुसार यलो झोनमध्ये आली आहेत. त्यामुळे या बांधकामधारकांनी किमान गुंठेवारी करून बांधकामे नियमत करणे आवश्यक होती.
मात्र तसे न केल्यामुळेच महापालिकेने या बेकायदा बांधकामा विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत सुरू असलेल्या पाडापाडीची आज मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पाडापाडी होत असली तरी त्यानंतर लगेचच रस्ते तयार करणार, असे मी बोललेलो नाही.
रस्ते तयार करताना जागेचे भूसंपादन करावे लागेल. त्यामुळे सध्या रस्ते करण्याचे कोणतेही नियोजन नाही. महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता व गुंठेवारी न करता डीपी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे केली असतील तर ती पाडणारच, सर्व्हिस रोडवर मनपाकडून लायटनिंग खांबे रोवून मार्किंग केली जाणार आहे.
अनेक वर्षांपासून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारल्या. व्यवसाय सुरू केला. मनपाची बांधकाम परवानगी किंवा गुंठेवारी करून घेण्याची तयारी दाखवली नाही. गुंठेवारी करून घेतली असती तर ही बांधकामे वाचवता आली असती, असेही ते म्हणाले.
विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांवर मार्किंग करून ठेवण्यात येत आहे. या मार्किंगच्या आत कोणालाही बांधकाम परवानगी दिली जाणार नाही. त्याबाहेर लेआऊट करून बांधकाम परवानगी घेतली किंवा गुंठेवारी केली तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भूसंपादन करून रस्ते तयार करणार, असे श्रीकांत म्हणाले.
सेव्हन हिल ते बाबा पंप या रस्त्यावर ४५ मिटर रुंदीच्या आत असलेली अतिक्रमणे बांधकामधारकांनी स्वतःहून काढून घ्यावी, असे आवाहन करीत शुक्रवारी जालना रोडने निघालेला मनपाच्या जेबीसी पथकाचा हा ताफा.