Crowds at camps for Kunbi certificates on the very first day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मराठा-कुणबी, कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांच्या नोंदींचे सूक्ष्मरीत्या अवलोकन आणि प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रियेसाठी गुरुवारी (दि. १०) सर्व तालुक्यांमध्ये मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजेच पोळ्याचा सण असूनही ग्रामीण भागातील नागरिकांनी शिबिरांना मोठा प्रतिसाद देत नोंदी व प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली. त्यासोबतच विविध मंडळांमध्ये अनेक नागरिकांनी अर्ज सादर केले.
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवालीमध्ये २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यात यावेत, यासह इतर मागण्या केल्या आहेत. त्यानुसार सरकारने त्याच्या मागणीची दखल घेत ७सप्टेंबरपासून ग्रामपंचायतनिहाय कुणबी नोंदणीच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तर आजपासून (दि. १०) मंडळनिहाय शिबिरे आयोजित केली.
१७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरांना पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मंडळांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी आपापल्या नोंदी तपासण्यासाठी गर्दी केली होती. यात भावसिंगपुरा येथे १० नागरिकांनी भेट देत माहिती घेतली, तर चार जणांनी अर्ज दाखल केले.
चौका येथे ७० अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सहा अर्ज परिपूर्ण आहेत. पाचोड व आडूळ येथे ७० नागरिकांनी भेट दिली असून ३० अर्ज दाखल झाले. त्यातील तीन अर्ज परिपूर्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आळंद येथे ३० नागरिकांनी शिबिरास भेट दिली. विशेष दरम्यान, शुक्रवार (११) रोजीही जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वरुड काझी, पिसादेवी, आपेगाव, विहामांडवा, बाबरा, वेरुळ, देवगाव रंगारी, चापानेर, सिल्लोड, पालोद, निल्लोड, सोयगाव, सावळदबारा, आसेगाव, गाजगाव, लोणी खु. आणि जाणेफळ येथे ही शिबिरे होतील. नागरिकांनी शिबिरांना भेट देऊन आपल्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील नोंदी व उपलब्ध माहितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नोंदी पाहून अर्ज दाखल
मंडळनिहाय शिबिराचा लाभ घेत अनेकांनी कुणबी नोंदींची पाहणी केली. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. यात पहिल्याच दिवशी मोठ्याप्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून त्यात परिपूर्ण अर्जाचा देखील समावेश आहे.
आमदार भुमरेंनी केली पाहणी
पैठण तालुक्यातील पाचोड येथे आयोजित शिबिरास आमदार विलास भुमरे यांनी भेट देत शिबिरांमध्ये सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्षात पाहणी केली. नागरिकांकडून प्रमाणपत्र प्रक्रिया आणि उपलब्ध नोंदींबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांवर लक्ष द्यावे, अशी सूचनाही दिल्या