छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आऑगस्ट, सप्टेंबर अशी दोन महिने कोरडी गेली. त्यामुळे खरीप पीक हातून गेले असून राज्य शासनाने विभागात ट्रिगर-१ लागू करीत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यात आतापर्यंत मराठवाड्यात ५२ लाख ३२ हजार ४७३ हेक्टरपैकी ३ हजार ५८६ गावांतील १३ लाख १५ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच २५.१४ टक्के क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
विभागात सर्वाधिक ४६.९० टक्के पंचनामे जालन्यात पूर्ण झाले आहेत. मराठवाड्यात यंदा जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी केली. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी दोन महिने पावसाने दीर्घ काळ दडी मारली. ऐन पिके वाढीच्या अवस्थेत असताना विविध मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.
सोयाबीन, कापूस, मका यांसह विविध खरीप पिकांचे नुकसान झाले. पर्जन्यतूट आणि अन्य निकषांच्या आधारे विभागातील ७४ तालुक्यांमध्ये प्रथम कळ लागू झाली असून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यापासून टँकरवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यातही टँकर सुरूच राहिले. आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि अगामी ब्बी हंगामातील पीक घेता यावे, यासत्तठी पीक नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राची निश्चित आकडेवारी उपलब्ध होऊन त्यानुसार मदतीची प्रक्रिया पुढे जाणार आहे