Crime News : 'Why do you throw stones?' Anger at being asked; Goons stab young man in the head with scissors
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मेडिकलवर औषध व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या दिशेने दगड भिरकावल्याचा जाब विचारल्याने, संतापलेल्या तीन गुंडांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना ३१ ऑगस्टला रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास जयभवानी नगरमध्ये घडली. एका आरोपीने तरुणाच्या डोक्यात थेट कात्री मारली. ही कात्री डोक्यात (कवटीत) तशीच घुसून अडकल्याने डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून ती काढावी लागली. हा संपूर्ण थरार तरुणाची पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीसमोर भररस्त्यात घडला.
दरम्यान आरोपी रोहित ऊर्फ पिल्ल्या भाऊलाल बोराडे (२०, रा. एसटी कॉलनी), सचिन गणेश बोडखे (३०, रा. जयभवानी नगर) आणि लक्ष्मण परमेश्वर साळुंके (रा. हनुमान नगर) या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. न्यायालयाने रोहित आणि सचिन दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून साळुंकेला बुधवारी (दि.२) रात्री अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी जितेश रमेश तुपशेंद्रे (३४, रा. गल्ली नं. १, जयभवानी नगर, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास जितेश हे त्यांची पत्नी अश्विनी आणि दीड वर्षाची मुलगी रेवा यांच्यासोबत जयभवानी नगर येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या 'जयभवानी जेनेरिक मेडिकल स्टोअर्स'वर डोकेदुखीची गोळी आणि आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते. ते दुकानासमोर उभे असताना पुतळ्याकडून त्यांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. हे दगड पत्नी व मुलीच्या अगदी जवळ पडल्याने ते घाबरून ओरडले, जितेश यांनी तिथे असलेल्या तीन तरुणांना, तुम्ही दगड का फेकला, माझ्या पत्नी व मुलीला लागला असता, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तू लई शहाणा झाला का? थांब तुला बघतो, असे म्हणत या तिघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
कात्री डोक्यात घुसली अन् बोटाचा घेतला चावा
मारहाण सुरू असताना आरोपींपैकी एकाने लक्ष्मण कात्री कुठे आहे, मार याच्या डोक्यात आणि याला मारून टाक, असे म्हटले. त्यावर आरोपी लक्ष्मण साळुंखे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कात्री जितेश यांच्या माथ्यावर (डोक्यात) जोरात मारली. ती कात्री डोक्यात घुसून अडकली. याचवेळी पिल्या ऊर्फ रोहित बोराडे याने जितेश यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाचा कडाडून चावा घेऊन त्यांना जखमी केले. तर, सचिन बोडखे यानेही बेदम मारहाण केली.
शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागली कात्री
तरुणाच्या डोक्यात खुपसलेली कात्री. तिघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. जितेश यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर लोक जमा झाले, तेव्हा 'सचिन, पिल्या चत्ला पोलिस आले' असे म्हणत आरोपींनी तिथून पळ काढला. गंभीर जखमी जितेश यांना एमजीएममध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या डोक्यात फसलेली कात्री बाहेर काढली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे हे करत आहेत.