Crime News : गुटखा विक्री, अस्वच्छतेवर कडक कारवाईचा इशारा file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : गुटखा विक्री, अस्वच्छतेवर कडक कारवाईचा इशारा

गंगापुरात पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांची व्यापारी, पानटपरी चालकांसोबत बैठक

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Warning of strict action against gutkha sales and unhygienic conditions

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गंगापूर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सलीम अमर चाऊस यांनी पदभार स्वीकारताच अक्शन मोडमध्ये कामकाजाला सुरुवात केली आहे. शहरातील व्यापारी, पानटपरी चालक, जिल्हा बँकेचे अधिकारी आणि विविध व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. गुटखा विक्री व अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांचा गंगापूर येथील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे साईड पोस्टिंगसाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची बदली संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलाच्या नियंत्रण कक्ष (डायल ११२) येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम अमर चाऊस यांची गंगापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.

पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक चाऊस यांनी शहरातील विविध घटकांशी परिचय व संवाद साधण्याच्या उद्देशाने व्यापारी, पानटपरी चालक, जिल्हा बँकेचे अधिकारी आणि व्यावसायिकांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असल्याची आठवण करून देत, कोणत्याही पानटपरीवर गुटखा विक्री होताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.

याशिवाय पानटपरी व व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरात स्वच्छता राखणे बंधनकारक असल्याचे सांगत, परिसर अस्वच्छ आढळल्यासही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, सुरक्षा व्यवस्था आणि इतर नागरी समस्यांकडे पोलिसांचे लक्ष वेधले. सर्व व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक चाऊस यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT